पुणे: सह्याद्री हॉस्पिटल समूहातील समभाग मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित झाल्यावर रुग्णसेवेवर परिणाम होणार का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता धर्मादाय सहआयुक्त कार्यालय सतर्क झाले आहे. धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाला हस्तांतराची कोणतीही कल्पना न दिल्याने आता हॉस्पिटलची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विशेष निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.
सह्याद्री हॉस्पिटलला महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्यातच आता धर्मादाय कार्यालयानेही चौकशी सुरू केली आहे. सह्याद्री रुग्णालय धर्मादाय असल्याने त्यांनी कोणताही व्यवहार करताना धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाला कल्पना देणे आवश्यक असताना तसे घडलेले नाही. प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांवरून कार्यालयाला याबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. (Latest Pune News)
सह्याद्री हॉस्पिटलचे शेअर मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित झाल्यावर धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णांना मिळणार्या लाभाचे काय, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णालयामध्ये निर्धन रुग्णांसाठी 10 टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, मोफत उपचारांची सोय आहे, तर दुर्बल घटकातील रुग्णांसाठी 10 टक्के खाटा राखीव असून, 50 टक्के सवलतीच्या दरात उपचार दिले जातात.
सह्याद्री हॉस्पिटल्या हस्तांतर व्यवहाराबाबत प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमधून माहिती मिळाली. याबाबत रुग्णालयाकडून काही कळवण्यात आले नव्हते. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन दिवसांपूर्वी निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
- रजनी क्षीरसागर, सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग.
सह्याद्री रुग्णालयातील समभाग मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित होण्याचा रुग्णसेवा, व्यवस्थापन अथवा संस्थेच्या मूलभूत मूल्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. पात्र रुग्णांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- डॉ. अमितकुमार खातू, मुख्य कायदेशीर व अनुपालन अधिकारी