

Transgender guards unpaid for three months
पुणे: महापालिकेच्या सुरक्षा विभागामध्ये कंत्राटी पद्धतीवरील तृतीयपंथी सुरक्षारक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला महापालिकेने नोटीस बजावली आहे. वेतनाअभावी या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांची होणारी परवड लक्षात घेऊन अन्य सुरक्षारक्षकांनी वर्गणी काढून त्यांना मदत केली आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीसह अन्य कार्यालय व मिळकती यांच्या सुरक्षिततेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक घेण्यात आले आहेत. या कंत्राटी सेवकांमध्ये 50 तृतीयपंथी सेवकांना सुरक्षारक्षक म्हणून घेण्याचा निर्णय प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला. (Latest Pune News)
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीमार्फत पहिल्या टप्प्यात 25 तृतीयपंथीयांना कंत्राटी सुरक्षारक्षकांची भरती करण्यात आली. त्यानुसार विविध ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, यामधील 13 तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून ईगल सिक्युरटी सर्व्हिसेस कंपनीने वेतनच दिलेले नाही.
या सेवकांचे पूर्वीचे नाव व आत्ताचे नाव वेगळे असल्याचे कारण देत हे वेतन थकविण्यात आले आहे. दरम्यान, वेतन थकवल्याप्रकरणी सुरक्षा अधिकार्यांनी ईगल कंपनीला नोटीस बजावली आहे. त्यानुसार या सुरक्षारक्षकांचे थकलेले वेतन, ईएसआय, पीएफ, विविध कारणाने कपात केलेला पगार आदी दिल्याशिवाय साडेचार कोटींचे बिल अदा केले जाणार नाही, असे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले.