

पुणे: आपण ई-तिकिटिंग अन् चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दिला जाणारा प्रवेश...अशा डिजिटल सुविधा मल्टिप्लेक्समध्ये पाहिल्याच असतील... काळानुरूप येणारा हा बदल स्वीकारत आता मल्टिप्लेक्सप्रमाणेच नाट्यगृहांची यंत्रणाही डिजिटल होत आहे. महापालिकेच्या सर्व नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रांमध्येसुद्धा अशीच आधुनिक डिजिटल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे प्रेक्षकांना नाट्यप्रयोगांचे ऑनलाइन तिकीट बुक करण्यासह मल्टिप्लेक्सप्रमाणे क्यूआर कोडद्वारे नाट्यगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ही सुविधा येत्या महिनाभरात सुरू होणार असून, नाट्यगृहांमध्ये पूर्णपणे डिजिटल तिकीट आणि प्रवेश व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
पुण्यात महानगरपालिकेची शहर आणि उपनगरांत मिळून 16 नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रे आहेत. गेल्या वर्षी नाट्यगृहांच्या तारखांच्या बुकिंगसाठी पालिकेच्या सांस्कृतिक विभागाने ‘रंगयात्रा’ हे ॲप सुरू केले. आता नाट्यगृहांमध्ये ऑनलाइन तिकीट बुकिंगनंतरही प्रत्यक्ष काउंटरवर जाऊन तिकीट घेण्याची प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांकडून छापील स्वरूपातील तिकीट तपासून नाट्यगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया बंद करण्यात येणार असून, सर्वच नाट्यगृह-सांस्कृतिक केंद्रांमध्ये पूर्णपणे डिजिटल तिकीट व्यवस्था आणि प्रवेश व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक विभागाने एका खासगी संस्थेसोबत याबाबत करार केला आहे.
ही संस्था डिजिटल सुविधेचे काम पाहणार असून, या नव्या सुविधेमुळे मोबाईलवर मिळालेला क्यूआर कोड स्कॅन करून थेट नाट्यगृहात प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. याविषयी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, मल्टिप्लेक्सप्रमाणे नाट्यगृहांमध्येही डिजिटल सुविधा असावी, या उद्देशाने विचार सुरू होता. एका खासगी संस्थेने याबाबत प्रस्ताव दिला आणि तो मंजूर झाला आहे. त्यानुसार येत्या महिनाभरात सर्व 16 नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रांमध्ये या सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत ऑनलाईन तिकीट बुकिंग करूनही प्रेक्षकांना प्रत्यक्ष नाट्यगृहात येऊन तिकिट घ्यावे लागत होते. त्यामुळे डिजिटल बुकिंगचा उद्देशच फोल ठरत होता. विशेषतः लोकप्रिय कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता नवीन व्यवस्थेमुळे सहा ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे. ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर तिकिटासाठी नाट्यगृहात येण्याची गरज राहणार नाही. कारण तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल. तसेच, क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे नाट्यगृहात प्रवेश प्रक्रिया जलद, सुलभ आणि पारदर्शक होईल. यामुळे आयोजकांनाही प्रेक्षक व्यवस्थापन, माहिती संकलन आणि गर्दी नियंत्रणासाठी मदत होईल.
ऑनलाईन तिकिटासह नाटकांच्या प्रसिद्धीसाठी एलईडी स्क्रीन
सध्या ऑनलाईन तिकीट घेतल्यानंतरही छापील तिकीट घेण्यासाठी काउंटरवर जावे लागत होते. त्यामुळे कार्यक्रमांच्या वेळी गर्दी आणि गोंधळ निर्माण होत होता. नव्या डिजिटल प्रणालीमुळे कागदोपत्री कामकाज कमी होऊन महापालिकेची सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जाणार आहे. इतकेच नव्हे तर नाट्यगृहांमध्ये एलईडी स्क्रीन बसविले जाणार असून, त्याद्वारेही नाट्य संस्थांना नाटकांची प्रसिद्धी करता येणार आहे.