

पुणे: शहरातील कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा आणि खराडी परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तब्बल 151 पेक्षा अधिक पब, बार आणि रेस्टॉरंट्सना महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. या हॉटेल्सनी अतिक्रमण दिलेल्या वेळेत काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
शहरात मोठ्या प्रमाणात पब, बार आणि रेस्टॉरंट आहेत. प्रमुख्याने कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा आणि खराडी परिसरात हे हॉटेल्स आहेत. या बारमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात जात - येत असते. तर, काही पब व बार मालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत अतिक्रमण केले आहेत. (Latest Pune News)
तसेच, रात्री उशिरापर्यंत हे पब चालू राहतात. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. तर इमारतींच्या टेरेसवर, साईड व फ्रंट मार्जिनमध्ये अनधिकृत बांधकाम करून व्यावसायिक उपक्रम चालवले जात असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.
या बाबतच्या अनेक तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा आणि खराडी परिसराची पाहणी केली. या पाहणीत एकूण 151 पब, बार आणि रेस्टॉरंट्स अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून खुलासा मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पृथ्वीराज यांनी सांगितले.
पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती
कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा आणि खराडी या भागातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती स्थापन केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत घोषणा करत, समितीला दर पंधरा दिवसांनी कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.