

Pune Sahyadri Hospital Manipal Deal
पुणे : पुणे महापालिकेच्या मालकीची जागा कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्टने एक रुपया दराने भाड्याने घेतली होती. या जागेवर पुण्यातील खासगी रुग्णालयाची साखळी असलेले सह्याद्री हॉस्पिटल बांधण्यात आले. मात्र, मंडळाने नियम डावलून ही जागा मणिपाल हॉस्पिटल्स समूहाला तब्बल सहा हजार 400 कोटी रुपयांना विकल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन अंधारात असल्याची माहिती समोर आली आहे.
माध्यमांत आलेल्या वृत्तानंतर या प्रकरणाची दखल महानगरपालिकेने घेतली असून, कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टसह सह्याद्री रुग्णालयाला यासंदर्भात झालेले करारपत्र पालिकेला पुढील 7 दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली. धर्मादाय संस्थांच्या नावाखाली अनेक संस्था राज्य शासन व पालिकेच्या जागा ताब्यात घेऊन, कालांतराने त्या खासगी गटांकडे वळवतात. सह्याद्री हॉस्पिटलचा विक्री व्यवहारदेखील त्याच पद्धतीचा आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे यांनी केला आहे.
1998 साली सह्याद्री हॉस्पिटल्सला 1 रुपया दराने 22 हजार स्क्वेअर फूट जागा 99 वर्षांच्या कराराने दिली होती. ही जागा सह्याद्री हॉस्पिटलला देत असताना ती धर्मादाय कारणांसाठी देण्यात येत असल्याचे म्हटले होते. डेक्कन परिसरातील मोक्याच्या ठिकाणी ही जागा असून, धर्मादाय कारणांसाठी दिलेल्या या जागेचा विक्री व्यवहार कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत महापालिकेच्या अधिकार्यांना विचारले असता त्यांना या प्रकाराची कोणतीही माहिती नसल्याचे उघड झाले. माध्यमांत आलेल्या वृत्तानंतर अधिकार्यांनी या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. यानंतर बुधवारी (दि. 16) संध्याकाळी पालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट आणि सह्याद्री हॉस्पिटलला नोटिस बजावली आहे. या नोटिशीत रुग्णालयाने मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप या संस्थेसोबत करारनामा केला असल्यास त्याची प्रत, महापालिकेची ही जागा कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण अथवा तारण ठेवली असल्यास त्याबाबतचे दस्त व त्यासाठी महापालिका आयुक्त यांची परवानगी घेतली असल्यास त्याची छायांकित प्रत, संपूर्ण प्रीमियम रकमेसह पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात भरणा केलेल्या पावत्यांची प्रत पुढील 7 दिवसांत सादर करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
तर पत्रात सात दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित अधिकार्यांना उत्तर सादर करू, असे कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने नमूद केले आहे.
महापालिकेतर्फे एरंडवणा येथील प्लॉट क्रमांक 30 वरील 1976 चौरस मीटर जागा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला 53 लाख 35 हजार 200 रुपयांचा प्रीमियम भरून दर वर्षी एक रुपया नाममात्र भाडे भरण्याच्या अटीवर 99 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. याबाबतचा करारनामा पुणे महापालिका व कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टसोबत 27 फेब—ुवारी 1998 रोजी नोंदवण्यात आला आहे. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट व सह्याद्री हॉस्पिटल यांनी 30 सप्टेंबर 2006 रोजी करार केला आहे; परंतु सह्याद्री हॉस्पिटलने नुकताच मणिपाल हॉस्पिटल ग्रुपशी परस्पर करार करून हे रुग्णालय हस्तांतरित केल्याचे वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे, असे महापालिकेच्या नोटिशीमध्ये नमूद आहे.
महापालिकेने बजावलेल्या नोटिशीनुसार ‘पुणे महापालिका व कोकण मित्र मंडळ यांच्या करारनाम्यातील अट क्रमांक आठमध्ये ही जागा अथवा या जागेचा कोणताही भाग, अथवा येथील इमारतीचा कोणताही भाग अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस भाड्याने, पोटभाड्याने, अथवा अन्य कोणत्याही प्रकारे वा कारणासाठी देता येणार नाही. मात्र, रुग्णालय योग्य रीतीने चालविण्याच्या उद्देशाने सेवा सुविधा प्रदान करण्यासाठी योग्य संस्था-कंपनीशी करारनामा करण्यास सवलत राहील. तसेच पालिका व मंडळाच्या करारामधील अट क्रमांक नऊनुसार संबंधित जागा कोणालाही गहाण, दान, बक्षीस अन्य कोणत्याही जडजोखमीत गुंतवता कामा नये. या जागेबाबत अन्य कोणाचेही कसल्याही प्रकारचे हक्क निर्माण करण्याचा अधिकार संबंधितांना नसेल. मात्र, हॉस्पिटलच्या इमारतीच्या बांधकामासाठी ही जमीन एखाद्या सरकारी बँकेकडे, सहकारी बँकेकडे अथवा अन्य कोणत्याही वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवायची असल्यास तशी परवानगी महापालिका आयुक्तांकडून घेणे बंधनकारक आहे.
सह्याद्री हॉस्पिटलच्या संचालकांनी सह्याद्री महाराष्ट्राबाहेरील कंपनीला यापूर्वी सुपूर्त केले. ते करतानाच डेक्कनची मूळ जमीन ज्या कोकण मित्रमंडळाला महापालिकेने दिली, त्या मूळ ट्रस्टी यांनी राजीनामे देऊन ज्या कंपनीला सह्याद्री हॉस्पिटल दिले, त्यांचे संबंधित लोक कोकण मित्रमंडळाचे ट्रस्टी झाले. आता सह्याद्री हॉस्पिटल सर्व चैन मणिपाल उद्योगसमूहाने सहा हजार कोटीला घेतले. पुणे मनपाची जागा मनिपाल समूहाकडे जाऊन पालिकेचा गरीब रुग्णांचा उद्देश असफल होणार आहे. त्यामुळे धर्मादाय उद्दिष्टासाठी शासनाकडून एक रुपया नाममात्र भाड्याने जमीन घेतलेल्या रुग्णालयांचे कंपनीकरण होत आहे. हे करताना पालिकेची कोट्यवधी रुपयांची जागा फक्त एक रुपया दराने वापरली जात आहे. पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, महापालिका आयुक्तांनी पालिकेची जागा वाचवली पाहिजे.
राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ
कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्ट आणि सह्याद्री हॉस्पिटलने त्यांची जागा इतर कुणाला विकली असल्यास या प्रकरणाची माहिती घेतली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- नवलकिशोर राम,आयुक्त, पुणे महापालिका