

कुडाळ : तिकिटाचे सुट्टी पैसे दिले नाही या रागाने प्रवाशाने वाहकालाच माराहाण केली. ही घटना पुणे -पणजी एसटीत कुडाळ बस स्थानक येथे सकाळी 8.10 वा घडली. प्रवाशांनी हातातील लोखंडी रिंगने वाहकाला माराहाण केल्याने यात वाहक किरण लक्ष्मण देवकुळे (46 रा. कोल्हापूर) हे जखमी झालेे. याप्रकरणी प्रवासी गुंडू सखाराम नाईक (रा. वेतोरे- वरचीवाडी)याच्यावर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुंडू नाईक याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.
कोल्हापूर आगाराची पुणे -पणजी एसटी पणजी एसटी घेऊन चालक नारायण पाटील जात होते. एसटी स. 7.10 वा. कणकवली बसस्थानकात पोहचली. त्यावेळी कणकवली येथे गुंडू सखाराम नाईक हे एसटीमध्ये बसले. त्याानी कणकवली ते कुडाळ अशी दोन तिकीटांची मागणी करत वाहका जवळ दोनशे रुपये दिले. एसटी तिकिट भाडे 194 रुपये होत असल्याने प्रवाशी श्री. नाईक यांनी वरील चार रुपये वाहकाला दिले. दरम्यान वाहकाजवळ दहा रुपये नसल्याने त्यांनी आपण तुम्हाला कुडाळ बसस्थानकात पोहचल्यावर दहा रुपये देतो असे सांगितले. मात्र तरीही श्री. नाईक यांनी वाहकाकडे दहा रुपयासाठी वारंवार तगादा लावला.
दरम्यान सकाळी 8.10 वा. एसटी कुडाळ स्थानकात आल्यावर श्री नाईक यांनी वाहकाकडे दहा रुपयाची मागणी केली. त्यावेळी वाहक श्री. देवकुळे यांनी आपल्याकडे वीस रुपयाची नोट असल्याने तुम्ही मला दहा रुपये द्या मी तुम्हाला 20 रुपये देतो असे सांगितले. मात्र श्री. नाईक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही प्रवाशांचे सुट्टे पैसे उकळता, असा आरोप करत वाहकाशी हुज्जत घालण्यास सुरवात करत शिविगाळ व ढकलाबुकल केली. तसेच आपल्या हातातील लोखंडी रिंग वाहक किरण देवकुळे यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. यानंतर अन्य प्रवाशांनी वाहकाला बाजूला नेले. यानंतर कुडाळ स्थानकातील वाहतूक नियंत्रकांच्या आदेशाने एसटी कुडाळ पोलिस स्टेशन येथे आणण्यात आली.
वाहक किरण देवकुळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीनुसार प्रवासी गुंडू नाईक याच्यावर बीएन एस 2023 132, 121(1), 352 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास :पोलीस हवालदार सचिन गवस करत आहेत. याप्रकरणी प्रवाशी गुंडू नाईक याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.