

पुणे : ढोल ताशा पथकांना सरावासाठी महापालिकेच्या मैदानांची जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 16) आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली. या वेळी ढोल पथकांच्या वादनसरावासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक असून, इतर जागा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासाठी पथकांची आणि पालिकेची संयुक्त समिती पाहणी करेल. मात्र, पालिकेची मैदाने व परिसर पथकांना सरावासाठी देणार नाही, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ढोल ताशा पथकांना सराव करण्यासाठी आवश्यक मैदाने उपलब्ध नाहीत. ती मिळावी यासाठी बुधवारी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले. या निवेदनात महापालिकेच्या ताब्यात असलेली मैदाने तात्पुरत्या स्वरूपात ढोल ताशा पथकांना उपलब्ध करून द्यावीत. सरावामुळेच ही पथके गणेशोत्सवात तालबद्ध पद्धतीने वादन करू शकतात. विविध पथकांना सध्या सराव कुठे करायचा, हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे महापालिकेची मैदाने पथकांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
शहरात नदीपात्रातील रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत, घाटांसह मोकळ्या व बंदिस्त जागेत विविध पथकांद्वारे सराव सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या सारसबागेजवळील सणस मैदान व पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या परिसरात काही पथके सराव करतात. सणस मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार, बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारीदेखील सराव केला जात आहे. राजकीय दबावामुळे या पथकांवर महानगर पालिकेमार्फत कारवाई केली जात नाही. परिणामी, मैदानात येणार्या खेळाडूंना सराव करता येत नव्हता. त्यामुळे यंदा ढोल पथकांना सरावासाठी महानगरपालिकेची मैदाने वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तब्बल 12 प्रस्ताव पालिकेच्या सांस्कृतिक विभागाने नाकारले.
यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, पालिकेच्या मैदानांवर ढोल ताशा पथकांना सरावासाठी परवानगी देणात येणार नाही. ठराविक जागेची मागणी होत असेल, तर पथकाचा उद्देश तपासण्यात येईल. शहराचे सांस्कृतिक व गणेशोत्सवातील ढोल पथकांचे महत्त्व अधोरेखित करून सरावासाठी पथकांना इतर जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, सराव करताना कुणाला याचा त्रास होणार नाही, असे आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले
ढोल पथकांनी वादनसरावासाठी परवानगी मागितली आहे. मागणीनुसार महापालिकेचे दोन अधिकारी व पथकांचे दोन प्रतिनिधी जागेची संयुक्तपणे पाहणी करतील. सरावाच्या जागेजवळ शाळा, रुग्णालये नसतील, मैदानांना अडसर होणार नाही, हे पाहून परवानगी दिली जाईल.
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.