

पुणे: महापालिकेची रणधुमाळी रंगात आली आहे. मतदानाला अवघे पाच दिवस राहिले आहेत. 15 जानेवारीला मतदान होणार असून, 13 तारखेला निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महापालिका प्रशासनामार्फत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
निवडणुकीसाठी 4 हजार 11 मतदान केंद्र ठरवण्यात आले आहेत. यातील 906 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. मतदानासाठी तब्बल 14 हजार 500 बॅलेट युनिट लागणार आहे, तर 5 हजार 500 कंट्रोल युनिट लागणार आहेत. ही निवडणूक शांततेत पार पाडावी, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे महापालिकेसाठी मतदानासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदान व मतमोजणीसाठी लागणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तब्बल 30 हजार कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 41 प्रभागांसाठी 165 जागा आहेत. 41 प्रभागांमध्ये 4 सदस्यीय 40 प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक 38 हा पाचसदस्यीय आहे. या निवडणुकीत 165 जागांसाठी 1 हजार 155 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या 277 आहे. प्रभाग क्रमांक 35मधील भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे.
त्यामुळे आता निवडणूक 163 जागांसाठी होत आहे. या निवडणुकीत तब्बल 12 हजार टपाली मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. 14 हजार 500 मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), तर 5 हजार 500 कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी, 1 शिपाई असेल. या निवडणुकीसाठी 1 हजार 51 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात पीएमपीएमएल बसेसचा समावेश आहे.
...या ठिकाणी होणार मतमोजणी
सारसबागेजवळ कै. बाबूराव सणस क्रीडांगण, शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ए लर्निंग स्कूल, वडगाव बु., टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे बंदिस्त पत्राशेड, शिवाजीनगरचे कृषी महाविद्यालय मैदान, कात्रज गोकुळनगर, हेमी पार्क, छ. संभाजी महाराज ई लर्निंग स्कूल, जिजाऊ मंगल कार्यालय, वानवडी, हडपसर-माळवाडी येथील साधना विद्यालय व ज्युनि. कॉलेजचे कर्मवीर सभागृह, खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलचा बॅडमिटन हॉल, कोथरूडमधील एमआयटीमधील द्रोणाचार्य बिल्डिंग पहिला मजला, भवानी पेठेतील रफी अहमद किदवाई उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पौड फाटा पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग््राजी शाळा, कोरेगाव पार्क मौलाना अब्दुल कलाम स्मारक, नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.
बिनविरोध उमेदवारांची नावे आयोगाकडे पाठवणार
पुणे महापालिकेसाठी 41 प्रभागांतील 165 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 1 हजार 155 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 35 मधील ब आणि ड जागेवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 1153 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जे उमेदवार बिनविरोध आले आहेत, त्यांच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
आचारसंहिता भंगप्रकरणी 2 गुन्हे दाखल
आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर जवळपास 8 हजार फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. पोलिसांनी 4 दखलपात्र, तर 5 अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. 67 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, 25 लाखांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.
मकर संक्रांतीनिमित्त वस्तू वाटल्यास गुन्हे दाखल होणार
14 तारखेला मकर संक्रांत असून, अनेक जणांमार्फत या दिवशी वस्तूंचे वाटप केले जाते. उमेदवाराने मतदारांना मकर संक्रांतीनिमित्त वस्तू, भेटवस्तू, वाण, साहित्य वाटप करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे, असे असताना जर कुणी वस्तूंचे वाटप केले, तर अशा उमेदवारांवर गुन्हे दाखल करणार आहे.