Pune Municipal Corporation Election: पुणे महापालिका निवडणूक; राजकीय समीकरणे आणि सत्तेचा कस

भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व मनसे यांच्या रणनितींतून कुणाची बाजू जड?
Municipal Corporation Election
Municipal Corporation ElectionPudhari
Published on
Updated on

सुनील माळी

पुणे महापालिकेत गेल्या वेळी स्वबळावर सत्ता मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधी असलेल्या मतांची तीन पक्षांत विभागणी होणार की भाजपमधील नाराजीचा फायदा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून ते सत्तेपर्यंत पुढे सरकणार ? यांवर पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल कुणाकडे झुकतो, ते ठरणार आहे. 'राज्यातील सत्तेतील तीनही पक्ष महापालिकेची निवडणूक एकमेकांविरोधात लढत असले तरी निवडणुकीनंतर ते एकत्र येऊ शकतात आणि बहुतेक ठिकाणचे महापौरपद युतीतील 'एका पक्षाकडेच राहील', हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नुकतेच केलेले विधान अफलातून राजकीय गुगलीचा नमुना म्हणून ओळखला जाईल. त्या विधानामुळे विरोधकांच्या टीकेतली हवाच निघून जाते का ? याकडे आता केवळ राजकीय निरीक्षकांचेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

Municipal Corporation Election
Pune WhatsApp Status Murder: पुण्यात व्हॉट्सॲप स्टेटसवरून तरुणाचा निर्घृण खून

'पुण्यात भाजपला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आव्हान देणार आणि त्या दोघांमध्येच तुल्यबळ अशी लढत होणार', असे भाकित राजकीय निरीक्षक निवडणुकीपूर्वी करीत होते, मात्र पाच दिवसांचा क्रिकेटचा खेळ जसजसा खेळला जातो तसतसा हारजितचा काटा इकडून तिकडे फिरत राहातो. कधी फलंदाजी ढासळते तर कधी गोलंदाजी. कधी खेळपट्टीवर चेंडू फिरू लागतो तर कधी ती पाटा होऊन जाते. निवडणूक ही अशीच खेळली जाते आणि इथे तर इथल्या टेस्ट मालिका खेळण्यात आणि सामने फिरवण्यात अनेक दशके माहीर असलेले शरद पवार, त्यांच्याकडून बाळकडू मिळालेले त्यांचे पुतणे अजित पवार, संघ मुशीतील चंद्रकांतदादा पाटील आदी खेळताहेत. त्यामुळे भाजप-अजितदादा अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता कमी होत गेली याचे कारण पहिल्या टप्प्यात झालेल्या घडामोडी.

Municipal Corporation Election
Pune Municipal Election Four Votes Rule: पुणे महापालिका निवडणूक; चार उमेदवारांना मतदान अनिवार्य!

जे होण्याची शक्यता वाटत होती, ते झाले नाही आणि जे होणारच नाही, असे बोलले जात होते, ते झाले, अशी या राजकीय टेस्ट मँचच्या पहिल्या दिवशीच्या खेळाची म्हणजेच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची फलश्रुती मानावी लागेल. भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांची युती होणारच, स्थानिक चर्चेला यश आले नाही तरी फडणवीस-शिंदे यांच्या चर्चेला ते निश्चित येईल, युती नक्की होईल, असे वाटत होते, प्रत्यक्षात ही युती अखेरच्या दिवशी तुटली. दुसऱ्या बाजूने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार राष्ट्रवादीही आघाडी होणे अनेक कारणांनी अवघड असल्याचे मानले जात असतानाच ती आघाडी झाली. काँग्रेसने भाजपबरोबर सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या बरोबर जाणे नाकारल्याने महाविकास आघाडीतून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस दूर झाला आणि आश्चर्यकारकरित्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आघाडी झाल्याने पुण्यातही उद्धव ठाकरे शिवसेना आणि राज यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकत्र यायला काहीच अडचण नव्हती. परिणामी काँग्रेस-उबाठा-मनसे हा तिसरा प्रमुख घटक या निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Municipal Corporation Election
Pune Municipal Election Dynasty Politics: पुणे महापालिका निवडणूक; नवे चेहरे, पण राजकीय घराणी तीच!

निवडणुकीचा निकाल काय लागेल, याचा नेमका अंदाज अंतिम टप्प्यातील प्रचारादरम्यान लागू शकतो. असे असले तरी पहिल्या टप्प्यातील मुद्दे भाजपला झुकते माप देणारे आहेत, एवढे मात्र नक्की. एकतर निवडून येण्याची क्षमता असलेल्या अनुभवी अनेक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षाकडे वळवण्यात हा पक्ष यशस्वी झाला. कोथरूड, बाणेर अशा ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन त्याने आपली बाजू बळकट केली. तसेच चक्क दोन जागांवरील सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यात यशस्वी ठरल्याने त्या पक्षाचे दोन जण बिनविरोध निवडून आले. याचा आणखी एक कळस झाला तो म्हणजे उबाठाचा एक उमेदवार चक्क प्रचार करताकरता भाजपच्या नेत्याच्या घरी गेला आणि त्या पक्षात त्याने प्रवेशच केला.

Municipal Corporation Election
Election Campaign Ground Reality: निवडणूक रणांगणातील एक दिवस; उमेदवाराची धावपळ आणि वास्तव

म्हणजेच वातावरणनिर्मितीमध्ये भाजपने बाजी मारली. दुसरा मुद्दा निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख पक्षांच्या पारंपरिक मतदारांमध्ये होणारी संभाव्य फूट या मुद्द्याची झळ भाजपला पोहोचलेली नाही, तथापि ती इतर पक्षांना कमीअधिक प्रमाणात सोसावी लागते आहे. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर भाजपचे मतदार आणि भाजपेतर मतदार असे दोन घटक निर्माण झाले आहेत. भाजपच्या मतदारांमध्ये फारशी फूट दिसत नाही, पण भाजपेतर मतदारांमध्ये ती जाणवेल एवढी लक्षणीय आहे. काँग्रेस या एकेकाळच्या प्रमुख पक्षाचे पारंपरिक मतदार आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विभागलेले आहेत. त्यातील अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी फूट पडली. राष्ट्रवादीची दोन शकले या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आली तरी त्यांचे मनोमिलन झाले आहे का, असा प्रश्न पडावा इतकी या दोन्ही पक्षांची देहबोली संदिग्ध आहे. त्यामुळे या दोन पक्षांपैकी एका पक्षाची मते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला किती पडतील, असा प्रश्न येतो. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचीच वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याच्या चर्चेने तर भाजपविरोधातील मते आपल्याकडे खेचण्यासाठी या दोन्ही पक्षांना भरपूर मेहनत करावी लागेल. उबाठा आणि मनसे यांच्या हक्काच्या भागांतून त्यांना कितपत यश येते ?, त्यावर जागांच्या संख्येच्या पाटीवर किती आकडे उमटतील, ते अवलंबून राहील तर गेल्या निवडणुकीतील अकरा जागांपेक्षा थोड्या अधिक जागा कशा मिळतील ?, याची काँग्रेसला चिंता लागल्याचे दिसते.

Municipal Corporation Election
Ladki Bahin scheme | लाडक्या बहिणींना मिळणार संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये

त्यातच सर्वात सुपर गुगली फडणवीस यांनी नुकताच टाकला. 'शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे आमचे मित्र पक्ष आहेत. त्यांच्या विरोधात स्थानिक निवडणुका लढल्या तरी निवडणुकीनंतर आम्ही मित्रपक्ष एकत्र येऊ', असे सांगून आणि 'युतीचेच बहुसंख्य महापौर होतील', असे जाहीर करून शिंदे-अजितदादा यांच्या प्रचाराची धारच त्यांनी कमी केली आहे. याला आता शिंदे-अजितदादा आणि अनुभवी शरद पवार कसे उत्तर देतात, हे पाहणे रंजक तर ठरणार आहेच, पण त्यावर निकालाची गणितेही अवलंबून राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news