

पुणे : एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. २३) दुपारी निलंबित कृषी सेवकाने हातात कोयता घेऊन थेट कार्यालयात प्रवेश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात तोडफोड केली. यावेळी आरोपीने कार्यालयातील संगणक फोडले तसेच कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले रमेश लक्ष्मण सकपाल (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सचिन कांबळे असून, तो पूर्वी कृषीसेवक म्हणून कार्यरत होता. सचिन कांबळे याची २६ मार्च २०१३ रोजी कृषीसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याची सेवा थांबविण्यात आली होती. नंतर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आणि पदोन्नतीही देण्यात आली. मात्र, जून २०१६पासून तो कोणतीही पूर्वसूचना न देता सातत्याने गैरहजर राहू लागला. त्यामुळे त्याचे वेतन व भत्ते थांबविण्यात आले होते. याच कारणावरून तो प्रशासनावर प्रचंड नाराज होता.
घटनेच्या दिवशी आरोपी प्रथम कार्यालयातील कर्मचारी विशाल शिंदे यांच्याशी खासगी संवाद साधण्यासाठी गेला. त्यानंतर तो थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कक्षात गेला. त्या वेळी अधीक्षक कार्यालयात उपस्थित नव्हते. सहाय्यक अधिकारी योगेश गडपायले यांनी साहेब दौऱ्यावर असल्याचे सांगितले. हे ऐकताच आरोपी संतप्त झाला. शिवीगाळ करत तो कक्षात शिरला आणि टेबलावर ठेवलेला संगणक फोडत कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
रमेश सकपाल व इतर कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हातातील कोयता बाहेर काढून कर्मचाऱ्यांच्या दिशेने उगारला. “या कार्यालयात कोणीही काम करणार नाही, काम केल्यास जीवे मारून टाकीन,” अशी धमकी त्याने दिली. भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांनी लागलीच 112 नंबरवर कॉल करण्याचे अवाहन केले आहे. माहिती मिळताच अलंकार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.