Pune Municipal Election: बिगुल वाजला… पुणे महापालिकेची निवडणूक यंत्रणा सज्ज
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्या अनुषंगाने पुणे महापालिकेने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी (दि १७) महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत आचारसंहितेचे योग्य अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांच्या निवडणुकांसाठी तब्बल २३ हजार ५०० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार महापालिकेने तयारी सुरू केली आहे. याचा आढावा आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), उपआयुक्त (निवडणूक), निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांचे प्रमुख उपस्थित होते. निवडणूक निःपक्षपाती, पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
आयुक्त म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होऊ नये याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच उल्लंघन आढळून आल्यास तत्काळ कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः दिव्यांग, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मतदान सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रे शक्यतो तळमजल्यावर स्थापन करण्यास प्राधान्य देण्यास सांगण्यात आले.
उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती व नमुने वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. २३ डिसेंबरपासून छापील नामनिर्देशन पत्रांचे वितरण व स्वीकार प्रक्रिया सुरू होणार असल्याने, २० डिसेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. निवडणूक कामकाजासाठी लागणारी अत्यावश्यक स्टेशनरी व इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. निवडणूक प्रक्रिया संवेदनशील असल्याने कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास ती तत्काळ शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावे व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व विविध कक्षप्रमुखांशी समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
दुबार मतदारांची काटेकोर तपासणी करा
मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देताना आयुक्त राम यांनी दुबार मतदारांच्या नावांबाबत आयोगाच्या आदेशानुसार काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी वेळापत्रक निश्चित करून मास्टर ट्रेनर्स उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही राम यांनी दिल्या. १०० टक्के मतदार स्लिप वाटपाचे काम बी.एल.ओ. मार्फत योग्य पद्धतीने पार पाडण्याचे नियोजन करण्यास देखील त्यांनी सांगितले.

