Pune Book Festival: पुणे पुस्तक महोत्सवात चरित्रे व वैचारिक साहित्याची चलती
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित तिसऱ्या 'पुणे पुस्तक महोत्सवा'ला पुस्तकप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून, पुणेकरांकडून पुस्तकांची भरभरून खरेदी सुरू आहे. त्यामध्ये महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्रग्रंथ आणि वैचारिक पुस्तकांना वाचक विशेष पसंती देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या महोत्सवात प्रथमच सहभाग घेत पुस्तकांचे दालन उभारले आहे. त्यामध्ये विभागातील विविध समित्यांनी प्रकाशित केलेल्या महान व्यक्तींचे चरित्रग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांना वाचकांकडून भरपूर मागणी असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे जीवनकार्य मांडणाऱ्या चरित्रग्रंथ, विविध प्रकारचे कोश, वैचारिक पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचकांची गर्दी होत आहे. याशिवाय 'एनबीटी'तर्फे प्रकाशित बालसाहित्य, कथा, चरित्र, विज्ञान अशा विविध विषयांवरील पुस्तकांकडेही वाचकांचा ओढा दिसून येतो. प्रेरणा आणि प्रगल्भ विचार देणारी ही पुस्तके वाचकांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (एनबीटी) आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात देशातील ऐंशीहून अधिक नामवंत प्रकाशकांची आठशेहून अधिक दालने पुस्तकांच्या खजिन्यांनी सजली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य या दालनांमध्ये उपलब्ध आहे. महोत्सवात सादर होणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांची विशेष दाद मिळवत आहेत, तर 'पुणे लिट फेस्ट'सारखा विचारप्रवर्तक साहित्य-संस्कृतीच्या उत्सवातून ज्ञानाची गंगा अवतरली आहे.
या वाचनोत्सवात जास्तीत लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रकाशकांकडून पुस्तकांच्या खरेदीवर आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. आयोजकांतर्फे महोत्सवाला भेट देणाऱ्या एक लाख विद्यार्थ्यांना 'आनंदमठ' हे पुस्तक मोफत दिले जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या खरेदीसाठी शंभर रुपयांचे विशेष सवलत कूपन उपलब्ध करून दिले आहे. सर्व भारतीय भाषांमधील साहित्यसंपदा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने वाचनप्रिय पुणेकरांची पावले 'पुणे पुस्तक महोत्सवा'कडे वळताना दिसत आहेत.

