

पुणे : महापालिका निवडणुकीमुळे बोचऱ्या थंडीत पुण्याचे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटण्याचे चिन्ह दिसत नसतानाच शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर प्रभाग क्रमांक २४ मधून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप या प्रभागातून जागा सोडण्यास इच्छुक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या जागा वाटपाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, भाजपकडून शिवसेनेला जिंकणे कठीण असलेल्या जागा दिल्या जात आहेत, ज्यामुळे शिवसैनिकांचा अपमान होत आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले. शिवसैनिक लाचारी पत्करणार नाहीत आणि सन्मानाने निवडणूक लढवतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पुण्यात शिवसैनिकांच्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी दर्शविली.
प्रणव धंगेकरांच्या उमेदवारीबाबत धंगेकर म्हणाले, त्याची समजूत घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, तो उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहे. त्यामुळे सोमवारी अर्ज भरतानाच यासंदर्भात स्पष्टता येणार आहे. भाजप आणि सेना युतीसंदर्भात सोमवारी चित्र स्पष्ट झालेले असेल आणि वरिष्ठ सांगतील त्यानुसार पुढील वाटचाल राहणार असल्याचे देखील धंगेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप-सेना युती होणार का? सेनेला किती जागा मिळणार? प्रणव धंगेकर अपक्ष लढणार की कोणत्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार? यासंदर्भातील सर्व चित्र सोमवारी स्पष्ट होणार असल्याचे दिसून येत आहे.