

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासाठी उमेदवार आल्याने क्षेत्रीय कार्यालयात मोठी झुंबड उडाली होती. अर्ज भरण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती.
त्यामुळे अनेकांनी आपल्या नातेवाईकांना पाठवून टोकन घेऊन अर्ज भरले. आपल्या कार्यकर्त्यांसह आलेल्या काही उमेदवारांमुळे प्रशासनाची उमेदवारी अर्ज स्वीकारतांना धावपळ उडाली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी ३०४१ अर्ज दाखल झाले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. तर ३० डिसेंबर शेवटचा दिवस होता. २९ डिसेंबरपर्यंत एकूण ११ हजार ७५६ इतक्या अर्जांची विक्री झाली होती. तर शेवटच्या दिवशी (दि. ३०) रोजी एकूण ४७० नामनिर्देशन फॉर्मची विक्री झाली आहे. तर २९ डिसेंबरपर्यंत एकूण ७४३ इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. मंगळवारी शेवटच्या दिवशी (दि. ३०) सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २२९८ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी एकूण ३ हजार ४१ अर्ज दाखल झाले आहेत.
१५ क्षेत्रीय कार्यालयावर अर्ज भरण्यासाठी सकाळपासून उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कागदपत्रे अपूर्ण असल्याने काही उमेदवारांची दमछाक झाली. तर किरकोळ ठिकाणी वादाचे प्रसंग देखील घडले. अर्ज भरण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यामुळे प्रशासनाने कार्यालयाची दारे बंद केली. त्यामुळे आत असणाऱ्यांनी व ज्यांनी टोकन घेतले अशा उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले.
महापालिका निवडणुकासाठी भरण्यात आलेल्या तब्बल ३ हजार ४१ अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्रे, सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही आदी तपासणी करून ज्यांचा अर्ज परिपूर्ण असेल त्यांचा अर्ज अंतिम करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी आहे. तर अंतिम उमेवारी यादी ३ जानेवारीला प्रसिद्ध होणार असून, या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पुणे महापालिकेने इच्छुक उमेदवारांसाठी आॅनलाइन प्रणालीद्वारे एकूण ४१ खात्यांना जोडून, उमेदवारांचा अर्ज एकावेळी सर्व खात्यांना ना-हरकत प्रमाणपत्रासाठी लिंक केले होते. हे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आॅनलाइन प्रणालीद्वारे एकूण ४०५७ अर्ज प्राप्त झाले. एकूण प्राप्त अर्जापैकी २७४ अर्ज खात्याच्या शिफारशीनुसार बाद करण्यात येऊन ३७८३ अर्जदारांना आॅनलाइन ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. तर पुणे महानगरपालिकेच्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या संकेतस्थळाला ६,९८,४८५ नागरिकांनी संपर्क साधला.
येरवडा-कळस-धानोरी-१८२
नगर रोड-वडगाव शेरी-१४१
कोथरूड-बावधन-१७४
औंध-बाणेर-११०
शिवाजीनगर-घोले रोड-१४८
ढोले-पाटील रोड-१२२
हडपसर-मुंढवा-२१३
वानवडी-रामटेकडी-८०
बिबवेवाडी-१६२
भवानी पेठ-२२४
कसबा-विश्रामबाग वाडा-१६०
वारजे-कर्वेनगर-१७१
सिंहगड रोड-१३४
धनकवडी-सहकारनगर-१८३
कोंढवा-येवलेवाडी-१०४
एकूण -२२९८