

पांडुरंग सांडभोर
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती एका जागेवरून तुटल्याने त्याचा भाजपला तब्बल 12 जागांवर थेट फटका बसला आहे. तर, एकही जागा जिंकता न आलेल्या शिवसेनेला भाजपमुळे दोन जागा गमावाव्या लागल्या. या दोन्ही पक्षांच्या वादाचा फायदा काँग््रेास-राष्ट्रवादीला झाला आहे.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी पुण्यात भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवेल, असे जाहीर केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या दोन्ही पक्षांत जागा वाटपावर एकमत झाले नाही. भाजपने 15 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, एका जागेवरून युती तुटल्याचे सांगितले जात आहे. युती न झाल्याने शिवसेनेने तब्बल 138 जागांवर उमेदवार उभे केले, त्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे तब्बल 13 जागांवर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला असल्याचे आता आकडेवारीवरून समोर आले आहे. तर, भाजपच्या उमेदवाराने घेतलेल्या मतामुळे शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी, तर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
भाजप-शिवसेनेच्या मतविभाजनाचा प्रभागनिहाय बसलेला फटका प्रभाग क्र. 6 मध्ये सर्व चार जागांवर काँग््रेासचे उमेदवार विजयी झाले. यामधील तीन ठिकाणी भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेली मते काँग््रेासच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक आहेत. शिवसेनेने मिळालेल्या मतांमुळे भाजपचे संतोष आरडे, आशा विटकर, संजय भोसले हे तिघे पराभूत झाले. प्रभाग क्र. 14 मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार सुरेखा कवडे यांना 15 हजार 753 मते मिळाली. मात्र, या ठिकाणी भाजपच्या मंगला मंत्री यांना 14 हजार 287, तर शिवसेनेच्या जयश्री कोद्रे यांना 2 हजार 114 मते मिळाली. त्यामुळे मंत्री यांचा पराभव झाला. प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादीचे अजित घुले यांना 25 हजार 286 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे शिवराज घुले यांना 20 हजार 492, तर शिवसेनेचे नीलेश घुले यांना 11 हजार 812 मते मिळाली.
प्रभाग क्र. 16 मध्ये राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली बनकरांना 13 हजार 879 मते मिळाली. त्यांच्याविरोधात तिसऱ्या क्रमाकांवर राहिलेल्या भाजपच्या शिल्पा होले यांना 13 हजार 97, तर शिवसेनेच्या अयोध्या आंधळे यांना 3 हजार 145 मते मिळाली. धक्कादायक म्हणजे बनकर ह्या केवळ 348 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्र. 22 मध्ये काँग््रेासचे रफिख शेख यांना 14 हजार 59 मते मिळाली, तर भाजपचे पराभूत उमेदवार संदीप लडकत यांना 13 हजार 699, तर शिवसेनेच्या अनिल दामजी यांनी 3 हजार 244 मते घेतली. प्रभाग क्र. 23 मध्ये राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकरांना 13 हजार 819 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या प्रतिभा धंगेकरांना 10 हजार 590, तर भाजपच्या उमेदवाराला 10 हजार 295 मते मिळाली. त्यामुळे आंदेकर विजयी झाल्या. तर, याच प्रभागात राष्ट्रवादीच्याच लक्ष्मी आंदेकर 141 मतांनी विजयी झाल्या. येथे भाजपच्या ऋतुजा गडाळे यांना 12 हजार 500 व शिवसेनेच्या वैष्णवी कराड यांना 6 हजार 593 मते मिळाली. प्रभाग क्र. 26 मध्ये राष्ट्रवादीचे गणेश कल्याणकर 13 हजार 380 मते घेऊन विजयी झाले. या ठिकाणी भाजपचे पराभूत उमेदवार विष्णू हरिहर यांना 11 हजार 751, तर शिवसेनेचे सिध्देश्वर जाधव यांना 2 हजार 145 मते मिळाली.
प्रभाग क्र. 28 मध्ये राष्ट्रवादीच्या प्रिया गदादे यांना 17 हजार 245 मते मिळाली, तर भाजपच्या मनीषा बोडके यांना 13 हजार 540, तर शिवसेनेच्या नलिनी आढाव यांना 4 हजार 238 मते मिळाली. याच प्रभागात राष्ट्रवादीचे दुसरे विजयी उमेदवार सुरज लोखंडे यांना 11 हजार 454 मते मिळाली. येथे भाजपच्या विनया बहुलीकर यांना 11 हजार 226, तर शिवसेनेच्या शीतल कुडले यांना 5 हजार 654 मते मिळाली. प्रभाग क्र. 30 मध्ये राष्ट्रवादीचे स्वप्निल दुधाने हे 355 मतांनी विजयी झाले. त्यांच्याविरोधात भाजपच्या सुशील मेंगडेंना 17 हजार 442, तर शिवसेनेच्या विनोद मोहिते यांना 2 हजार 358 मते मिळाली. मतविभाजनाचा फायदा दुधाने यांना झाला. प्रभाग क्र. 38 मध्ये राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरेंना 30 हजार 674 मते मिळाली. त्यांच्याविरोधात भाजपच्या अश्विनी चिंधे यांना 21 हजार 329, तर शिवसेनेच्या वनिता जांभळे यांना तब्बल 13 हजार 995 मते मिळाली. याच प्रभागात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नगरसेविका सीमा बेलदरे यांना 28 हजार 679 मते मिळाली. त्यांच्याविरोधात भाजपच्या राणी भोसले यांना 21 हजार 517 मते मिळाली. मात्र, शिवसेनेच्या संध्या बर्गे यांना 11 हजार 564 मते मिळाल्याने भोसले यांचा पराभव झाला. प्रभाग क्र. 31 मध्ये राष्ट्रवादीचे निवृत्ती बांदल यांना 22 हजार 280 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे नाना भानगिरे यांना 16 हजार 643 मते, तर भाजपच्या जीवन जाधव यांना 14 हजार 550 मते मिळाली, त्यामुळे भानगिरे यांचा पराभव झाला.