

दौंड: दौंड शहरातील हॉटेल जगदंबा येथे झालेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. याप्रकरणी होणारा तपास संथ गतीने होत असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. दहा कर्मचारी जीवन-मरणाच्या दारात असतानाही हॉटेल मालक, व्यवस्थापक, तसेच गॅस वितरक व पुरवठादार यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिस नेमके कोणासाठी काम करत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
या प्रकरणात जबाबदार असलेल्या घटकांवर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. यबाबत विचारले असता पोलिसांकडून फक्त ‘तपास सुरू आहे’ असे मोघम उत्तर दिले जाते. दौंड पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांनी, ‘दोघांना नोटीस देऊन चौकशी करण्यात येईल. माहिती घेतल्यानंतर कारवाई होईल,’ असे सांगितले आहे.
प्रत्यक्षात मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाल्यानंतरही अटक करण्यास होत असलेली दिरंगाई संशयास्पद मानली जात आहे. त्यामुळे तपासाची ही प्रक्रिया केवळ वेळकाढूपणा आणि कारवाईचा दिखावा तर नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
दौंड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. शहरातील अनेक हॉटेल्समध्ये आजही घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रासपणे वापर सुरू आहे. याबाबत दौंड पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस तपासणी केली जात नाही. त्याचप्रमाणे, शहरात काम करणाऱ्या परप्रांतिय अनेक कामगारांच्या नोंदी पोलिस ठाण्यात उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
पोलिस अधीक्षकांचे मौन
घरगुती गॅसचा हॉटेलमध्ये स्फोट होऊन काही कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेनंतर पोलिस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालणे अपेक्षित होते. मात्र, याप्रकरणी एसपींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होणार का, की केवळ कागदोपत्री पूर्तता करून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.