

जावेद मुलाणी
इंदापूर: दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आघाडी करीत असल्याने राजकारणात कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि सध्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे आता एकत्र निवडणूक लढवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग््रेास गटामधील आघाडीमुळे हा अनपेक्षित राजकीय संगम घडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड घालमेल सुरू झाली आहे. खरोखर ही दिलजमाई होणार का? हाच प्रश्न आता कार्यकर्त्यांसह मतदारांना देखील पडला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 21 जानेवारी ही अखेरची तारीख आहे. मात्र, पक्षाकडून अधिकृत आदेश आल्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे संदेश राष्ट्रवादी काँग््रेासकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झालेल्या व उमेदवारीचा शब्द दिलेल्या इच्छुकांची नव्या राजकीय समीकरणामुळे घालमेल सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय संघर्ष हा गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. चारवेळा एकमेकांविरोधात विधानसभा निवडणूक लढलेले हे नेते स्थानिक प्रश्नावरून नेहमीच टोकाची भूमिका घेताना पाहायला मिळाले.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रत्युत्तरामुळे कार्यकर्त्यांमध्येही तीव राजकीय दरी निर्माण झाली होती. मात्र, आता वरिष्ठ पातळीवरील आघाडीच्या निर्णयामुळे हे दोन कट्टर विरोधक एकत्र येण्याची वेळ आली आहे. एकीकडे सत्ता, विकास आणि राजकीय स्थैर्यासाठी आघाडी अपरिहार्य असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांची तगमग, नाराजी आणि मनोबल टिकविण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर उभे ठाकले आहे. ही आघाडी केवळ कागदावर मर्यादित राहते की प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या मनोमिलनातून मजबूत होते, हे येणारा काळच ठरवणार आहे. सध्यातरी या अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असून, ’नेते जुळले तरी कार्यकर्ते जुळतील का?’ हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
बारामतीतील या फोटोची होतेय इंदापुरात चर्चा
शनिवारी (दि. 17) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी एकत्रित येत निवडणुकीवर चर्चा केली. त्यानंतर कृषिक प्रदर्शनानिमित्त वरील नेतेमंडळी आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्रित दिसल्याने या वेळी नेमकी कोणती चर्चा झाली? याचीच जोरदार चर्चा सध्या इंदापूर तालुक्यात होत आहे.
कार्यकर्त्यांची मने जुळतील का?
दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे नेत्यांच्या राजकीय गणिताला बळ मिळणार असले, तरी तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का? हा खरा प्रश्न आहे. कालपर्यंत ज्यांच्याविरोधात आंदोलन, प्रचार आणि संघर्ष केला, त्यांच्याच बाजूने आज उभे राहावे लागणार असल्याने अनेक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. काही कार्यकर्ते हा निर्णय पक्षहितासाठी आवश्यक असल्याचे मानत असले, तरी अनेकांच्या मनात नाराजी, संभम आणि प्रश्नचिन्ह कायम आहे. नेत्यांचे हात मिळाले, तरी कार्यकर्त्यांचे मन जुळेल का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
काँग््रेास, राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपची तालुक्यात ताकद वाढली
स्वातंत्र्यापासून काँग््रेास विचारधरणीच्या तालुक्यापुढे राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी इंदापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नूतन सात नगरसेवकांबरोबरच तालुक्यातील अनेक नेते भाजपमध्ये जात असल्याने भाजपची ताकद वाढू लागली आहे.