

पुणे: पुणे महापालिकेत भाजप-शिवसेना युती झाली नसल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. जागा वाटपाचा अखेरपर्यंत राहिलेला तिढा वरिष्ठपातळीवर सुटू शकला नाही. त्यातच भाजपने सर्वच्या सर्व 165 जागांवरील उमेदवार जाहीर केल्याने आता पुण्यात भाजप-शिवसेनेसमवेत राष्ट्रवादी काँग््रेास आणि काँग््रेास आणि ठाकरे सेना, अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणूक भाजप व शिवसेना पुण्यात एकत्रित लढेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातच केली होती. त्यानंतर आचारसंहिता जाहीर झाल्यापासून या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती. शिवसेनेने भाजपकडे 40 ते 45 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने केवळ 8 ते 10 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यावरून शिवसेनेत पडसादही उमटले होते. अखेर चर्चेच्या टप्प्यांत भाजपने 15 जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, किमान 25 जागा द्याव्यात अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. त्यातच शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना जागा सोडण्यास भाजपने नकार दिला. त्यामुळे दोन्ही पक्षातील दरी आणखीच वाढली.
युती तुटली असे शिवसेनेचे नेते खासगीत सांगत असतानाच वरिष्ठ नेते मात्र, यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकत्र घेतील असे सांगत होते. मात्र, अखेरपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्येही चर्चा झाली नाही. गुरुवारी भाजपने सर्वच्या सर्व 165 जागांवरील उमेदवारी यादी जाहीर करून अप्रत्यक्षरीत्या युतीचा पोपट मेला असल्यावर शिक्कामोर्तब केला. मात्र, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्यापही तशी घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, आता युती तुटल्याने भाजप, शिवसेना एकत्रित दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास आणि ठाकरे सेना, काँग््रेास व मनसे यांची आघाडी अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून, किती प्रभागांमध्ये या चार पक्षांमध्ये सरळ लढत होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीसाठी आज अखेरची मुदत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची बंडखोरी रोखण्यासाठी कस लागणार आहे. भाजप-शिवसेना युतीचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने भाजपची डोकेदुखी कायम राहण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीमधील बंडखोरी रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आज किती बंडखोरांचे बंड शमणार आणि किती जण रिंगणात राहणार याचेही चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिकेच्या 165 जागांसाठी तब्बल 3 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. अर्ज छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर आज शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जमाघारीची अंतिम मुदत आहे. गुरुवारी जेमतेम 70 ते 80 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवार अद्यापही रिंगणात आहे. जवळपास सर्वच पक्षांत मोठी बंडखोरी झाली आहे.
त्यात भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पातळीवर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, युती तुटली असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले असून, तब्बल 26 प्रभागांमध्ये शंभरपेक्षा अधिक जागांवर सेनेचे भाजपापुढे आव्हान कायम राहील अशी शक्यता आहे, तर अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळालेल्या भाजपा बंडखोरांची मनधरणी करण्याचे काम पक्षाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासची आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेवटच्या क्षणी 70पेक्षा अधिक जागांवर उमेदवार उभे करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण केली आहे. याशिवाय त्यांच्या पक्षात अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ती रोखण्यासाठी स्वत: अजित पवार मैदानात उतरले आहेत. बंडखोरांना स्वत: पवार फोनाफोनी करून त्यांची मनधरणी करीत असल्याचे सांगितले, तर काँग््रेास-ठाकरेंच्या शिवसेनेला फारसा बंडखोरीला फटका बसलेला नाही. मात्र, शिवसेनेने मनसेला 25 जागा दिल्या असताना 44 ठिकाणी मनसेकडून उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. हे अर्ज माघारी घेण्यासाठी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच आजचा दिवस सर्वच पक्षांतील नेत्यांचा कस लागणारा ठरणार आहे. आज सायंकाळपर्यंत किती जणांनी माघारी घेतली आणि किती जण निवडणुकीच्या रिंगणात राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.