

पुणे : काँग्रेस-शिवसेना आणि मनसे या तिन्ही युती झालेल्या पक्षांचा पुण्यातील जागावाटपांचा फॉर्म्युला ठरला, तरी मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित जागावाटपापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही स्थिती तिन्ही पक्षांमध्ये असून, पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना येत्या 2 तारखेला अर्जमाघारी घेण्यासाठी फाेन करावे लागतील. साहजिकच हे फाेन कोणाला जाणार, हे अनिश्चित असल्यामुळे अर्ज भरलेल्या उमेदवारांमध्ये धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिन्ही पक्षांनी संयुक्त बैठक घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. मात्र, प्रत्यक्षात अधिकचे उमेदवारी दाखल करण्यात आले, त्यामुळे जागा वाटप फॉर्म्युल्यानुसार उमेदवारांना निवडणूक लढवता येणार की, आणखी काही तडजोड करून, गुप्त बैठका घेऊन, येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होणार, हे आता पाहावे लागणार आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि.30) शिवसेना उबाठा, काँग्रेसमध्ये काही इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे रात्री उशिरापर्यंत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष संजय मोरे यांनी जागावाटपाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, काॅंग्रेस पक्षाला ९० जागा असून, शिवेसनेला 52 जागा निश्चित केल्या आहेत. त्याचबराेबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 23 जागा देण्यात आल्या आहेत.
मंगळवारपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारीबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या 105 उमेदवारांनी, शिवेसनेच्या ८० आणि मनसेच्या २५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
वंचित बहुजन आघाडी काँग्रेसबरोबर येण्याचे अटकाव बांधले जात होते. त्यादृष्टीने काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी चर्चेशिवाय काही केले नाही. यादरम्यान, काँग्रेस पक्षाच्या विजयी होण्याच्या जागांच्या मागणीसह 40 ते 50 जागांची मागणी केली होती. ते शक्य नव्हते त्यामुळे, वंचित बहुजन आघाडीशी युती नसल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले.
जागावाटपाचे आमचे नियोजन बैठकांमध्ये प्राथमिक स्तरावर झाले आहे. यात काँग्रेसला 90 शिवसेनेला 52 आणि मनसेला 23 जागा देण्याचे नियोजन आहे. मात्र, अंतिम चित्र येत्या 2 तारखेनंतर स्पष्ट होईल. मंगळवारी दिवसभरात काही इच्छुक नाराज झाल्याचे समोर आले. मात्र, आम्ही त्यांची रात्री उशिरापर्यंत समजूत काढलेली आहे.
संजय मोरे, शहराध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षातील 80 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच काँग्रेसकडून 105 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय मनसेकडून 25 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची संख्या कितीही असली तरी दोन तारखेला माघारीनंतर अंतिम उमेदवार लढतीसाठी निश्चित केले जातील.
गजानन थरकुडे, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
शिवसेना मनसे आणि काँग्रेसचे झालेल्या बैठकांमध्ये आम्हाला 25 जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे मंगळवारी आमच्याकडील 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आमच्याकडील 25 उमेदवार निवडणूक लढतीसाठी तयार आहेत.
साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे
पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांमध्ये आघाडी झाली असून, काँग्रेसच्या वाट्याला 98 जागा, तर शिवसेनेच्या वाट्याला 70 जागा आल्या आहेत. शिवसेनेच्या 70 जागांपैकी 25 जागा या घटकपक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात आल्या. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जागा वाटपाचा तिढा सुटला अन् पक्षातर्फे सर्व उमेद्वारांना सकाळीच ए आणि बी फॉर्म देण्यात आला.
अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस