

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने राज्यात शोककळा असताना पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे पत्र समोर येताच प्रशासनावर तीव टीकेची झोड उठली आहे. सर्व स्तरांतून संताप व्यक्त झाल्याने व वाढत्या दबावानंतर अखेर महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याचे जाहीर करत सर्व आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या सांस्कृतिक कलामंचामार्फत अधिकारी व सेवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी नृत्य (वैयक्तिक व समूह), नाटक, ऑर्केस्ट्रा (मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण), वादन तसेच छायाचित्र, हस्तचित्र व कलाकृतींचे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित होते. याबाबत कामगार कल्याण विभागाने कार्यालयीन परिपत्रकही प्रसिद्ध केले होते.
या परिपत्रकानुसार इच्छुक अधिकारी व सेवकांनी 10 फेबुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सहभागासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. अर्जासोबत सहभागी होणाऱ्या कार्यक्रमाचे नाव, कार्यक्रमासाठी लागणारा अंदाजे वेळ, अधिकारी अथवा सेवकाचे नाव, खाते, तसेच प्रमाणपत्र क्रमांक अशी माहिती देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. छायाचित्र, हस्तचित्र व कलाकृती प्रदर्शनासाठी नवीन कलाकृती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि प्रशासनात सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले होते. तसेच सर्व खात्यांचे प्रमुख व विभाग प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी व सेवकांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, अशी विनंतीही करण्यात आली होती. हे परिपत्रक मुख्य कामगार अधिकारी तथा अध्यक्ष, पुणे महापालिका सांस्कृतिक कलामंच यांच्या स्वाक्षरीने जारी केले होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी तंबी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकही दुःखात आहे. अनेकांनी आपले खासगी कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यांच्या निधनाला अद्याप एक महिनाही झालेला नाही. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे ही लाजीरवाणी व संतापजनक बाब असून, याचा तीव निषेध करतो.
बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त नियोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका