

पुणे: पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान संस्था (आयसर) आणि राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए)च्या खगोलशास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधन करीत पहिल्या महाकाय रेडिओ दीर्घिकेचा शोध लावला आहे. यात रेडिओ लहरीच्या उत्सर्जनाचे चार स्वतंत्र पट्टे टिपण्यात यश आले आहे.
आयसर संस्थेतील पवन विजय खाडेकर, रमणा आत्रेय आणि एनसीआरएमधील धरम वीर लाल या तीन शास्त्रज्ञांचे हे संशोधन नुकतेच दी ॲस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनासाठी त्यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी), अमेरिकेतील व्हेरी लार्ज ॲरे आणि दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट या दुर्बिणीतील निरीक्षणांचा वापर केला आहे.
शास्त्रज्ञांची निरीक्षणे...
ही महाकाय दीर्घिका चौथे आयुष्य जगत आहे. तिचा प्रवास काही दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला. तिचा पहिला जीवनकाळ २१ दशलक्ष वर्षांपूर्वी संपुष्टात आला.
जे हॉटस्पॉट शोधले त्यांचे वय सुमारे ६ ते २१ दशलक्ष (६० लाक ते २ कोटी वर्षे) आढळून आले.
एक मृत आणि एक जिवंत असे संशोधन करणे कठीण काम असते. मात्र, या संशोधनाचे चार टप्पे समोर आल्याने दोन सक्रिय झोतांमधील काळ मोजणे सोपे झाले.
या दीर्घिकेचा विस्तार ४.२ दशलक्ष ( ४२ लाख ) प्रकाशवर्षे इतका आहे. ही दीर्घिका आजवर ज्ञात असलेल्यापैकी सर्वांत मोठी आहे. ती संपूर्ण सरळ न दिसता एस या इंग्रजी अक्षरात सर्पीलाकारात आहे.