Pune Cleaning Contract: पुण्यात स्वच्छतेच्या कंत्राटात नेमकं काय सुरू? ४२ कोटींच्या कामावर प्रश्न, अहवाल ३० ऑक्टोबरला

ठेकेदारांचे कर्मचारी प्रत्यक्ष कामावर नसल्याच्या तक्रारी; पालिकेचे कर्मचारी ठेकेदारांचे जॅकेट घालून झाडणकाम करत असल्याचे निदर्शनास
Pune Cleaning Contract
Pune Cleaning ContractPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील अनेक भागांत ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांऐवजी महापालिकेचेच स्वच्छता कर्मचारी झाडणकाम करत असल्याचे समोर आले. त्यामुळे शहर स्वच्छतेच्या नावाखाली खासगी ठेकेदारांवर कोट्यवधी रुपयांची खैरात करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, ठेकेदारांच्या नावावर दाखवल्या जाणाऱ्या कामाचा प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळतोय, हा सवालही उपस्थित होत आहे.

महापालिकेचे साडेचार हजार स्वच्छता कर्मचारी आणि खासगी ठेकेदारांचे साडेचार हजार कर्मचारी शहरात झाडणकाम करीत होते. मात्र, उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करून नऊ हजारांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.

Pune Cleaning Contract
Arabian Sea cyclone | अरबी समुद्रात २६ तारखेला चक्रीवादळाची शक्यता; राज्यात आजपासून मध्यम पावसाचा अंदाज

यासाठी निविदाप्रक्रिया न राबविता थेट काम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यास ४२ कोटींच्या कामास स्थायी समितीनेही मान्यता दिली. या निर्णयासाठी रस्त्यांच्या लांबीचाही आधार घेण्यात आला. महापालिकेच्या पथ विभागाच्या नोंदीनुसार शहरातील रस्त्यांची लांबी २३९४ किमी असताना, प्रशासनाने नऊ हजार किमीचे रस्ते गृहीत धरल्याचे सांगितले जात आहे.

या आकडेवारीच्या आधारे ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. परिणामी, महापालिका आणि ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १३ हजारांवर पोहोचली. वाढीव मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना झाडणकामातून बाजूला करून त्यांच्याकडून कार्यालयांची स्वच्छता आणि ड्रेनेजसंबंधित बिगारी कामे करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Pune Cleaning Contract
India Childhood Blindness: देशात ९३ लाख मुले दृष्टिबाधित; ७५ टक्क्यांहून अधिक दृष्टिदोष टाळणे शक्य

कसबा आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य क्षेत्रीय कार्यालयांनी ठेकेदारांचे कर्मचारीच झाडणकामासाठी वापरावेत, असे आदेश देण्यात आले होते.

जॅकेट ठेकेदाराचे; कर्मचारी मात्र पालिकेचे!

प्रशासनाच्या आदेशानंतरही अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये महापालिकेचेच कर्मचारी रस्त्यांवर झाडणकाम करीत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, ठेकेदारांचे कर्मचारी प्रत्यक्षात कामावर दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी ठेकेदारांचे जॅकेट घालून काम करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष काम पालिकेचे कर्मचारी करत असताना कागदोपत्री ते ठेकेदारांनी केल्याचे दाखविले जात आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली असली, तरी ठेकेदारांच्या कामाचे मूल्यमापन, कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि खर्चाची पडताळणी यातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

नगरसेवकांची स्थायी समितीमध्ये तक्रार

शहरातील रस्त्यांची स्वच्छता सुधारण्यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या 'परफॉर्मन्स बेस्ड' झाडणकामाच्या प्रायोगिक प्रकल्पाच्या अंमलबजावणीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठेकेदारांकडून एकाच कर्मचाऱ्याला तीन वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांतील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी वापरले जात असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे कागदोपत्री दाखवण्यात येणारे मनुष्यबळ आणि प्रत्यक्ष रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या यामध्ये तफावत असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

या प्रायोगिक प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे. मंजूर कर्मचारी संख्या, प्रत्यक्ष कामावर उपस्थित असलेले कर्मचारी आणि झाडण कामाची सद्य:स्थिती यांचा तपशील या अहवालात अपेक्षित आहे. हा अहवाल ३० ऑक्टोबरपर्यंत स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्यामुळे कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष कामावरील मनुष्यबळ यांतील तफावत स्पष्ट होण्यास मदत होईल.

- श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष स्थायी समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news