

पुणे : प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. पुण्यात महापालिकेच्या पथकाने गेल्या तीन वर्षात प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत १ कोटी ३७ लाख १० हजार रुपयांची वसूली केली आहे. तर १० हजार किलोपेक्षा अधिक प्लॅस्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावली आहे. येत्या काळात प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यात येणार आसल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी बुधवारी (दि.४) दिली.
पुणे महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच दंडात्मक रक्कम देखील वसूल करण्यात आली. या कारवाईत काही ठिकाणी १५,००० रुपये दंड आकारण्यात आला आहे, तर काही ठिकाणी ५,००० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत १ कोटी ३७ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मुख्य बाजार पेठेसह विविध भागात छापे टाकून अनेक दुकानातून प्लास्टिक तसेच थर्माकोलचे साठे जप्त करण्यात आले आहेत. प्लास्टिक विरोधी कारवाई अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, मंडई, भाजी बाजार येथेही महापालिकेचे भरारी पथक तपासणी करून कारवाई करणार आहेत.
विविध सामाजिक संघटनांच्या माध्यतून पुणे महानगरपालिका शहरात प्लास्टिक संकलनाची मोहीम राबवत आहेत. या मोहिमेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात प्लास्टिक बंदीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर दिला जात असल्याचे कदम यांनी सांगितले.