

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा
नगर परिषदेकडे कर्मचारी असतानादेखील शहराच्या विविध भागांसह नवीन नगर रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदीची कारवाई करणारे त्रयस्थ लोकांचे हे पथकच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
कारवाई करणाऱ्या माणसांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र अथवा कारवाईसाठी प्राधिकृत केल्याचे पत्र नसल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. यामुळे प्लास्टिक बंदीच्या नावावर कारवाई करणारे कर्मचारी नेमके कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मंगळवारी दुपारी नवीन नगर रस्त्यावर काही फळ विक्रेत्यांकडील प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करीत ते जप्त करण्याचे काम दोन-तीन तरुण करीत होते. या कर्मचाऱ्यांना पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी याबाबत विचारणा केली असता, 'तुम्ही नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांशी बोला. त्यांनीच आम्हाला कारवाई करण्यासाठी पाठविले आहे,' अशा शब्दात या तरुणांनी उत्तरे दिली.
विशेष असे की, या तरुणांकडे कारवाईदरम्यान कोणताही गणवेश, ओळखपत्र अथवा मुख्याधिकाऱ्यांचे पत्र नव्हते. यामुळे या संदर्भात विचारणा केली असता, 'मुख्याधिकाऱ्यांना बोलावून घेतो, तुम्ही त्यांच्याशीच बोला,' अशी भाषा वापरुन तरुणांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठी गर्दी जमली होती, दरम्यान, या ठिकाणी आलेल्या पालिकेतील एका कर्मचाऱ्यांने बाद घालणाऱ्या संबंधित तरुणांना शांत केले.
संबंधित तरुण कुणाच्या परिचयातील नसल्याने ते नेमके कोण, याबाबत विचारणा केली असता, एकाने 'मी आदर्श सर्विसेसचा कर्मचारी आहे,' अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला दिली, त्याच्याकडे देखील ओळखपत्र नव्हते. एक कर्मचारी पालिकेत नव्यानेच बदलून आला आहे. त्यांच्याकडे देखील ओळखपत्र नसल्याने संभ्रम निर्माण झाला,
यामुळे नगरपालिकेकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध असताना मुख्याधिकाऱ्यांना शहराचा कचरा उचलण्याचा ठेका दिलेल्या कंपनीच्या कामगारांची मदत का घ्यावी लागली, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे, आत्तापर्यंत नेमक्या किती लोकांवर पालिकेने कारवाया केल्या? किती प्लास्टिक पकडले? यात प्लास्टिक विक्रेते किती, असे देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
प्लास्टिक विक्रेत्यांना सोडून किरकोळ भाजीपाला, फळ विक्रेत्यांवर कारवाई कशासाठी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हायलाच हवी याच्याशी आम्ही सहमत आहोत,
मात्र शहरातील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या किरकोळ भाजीपाला, फळ विक्रेत्यांकडे प्लास्टिक येते कुठून, याचा शोध घेऊन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अशा मोठ्या विक्रेत्यांवर छापेमारी करून कारवाई करायला हवी. शिवाय शहरात काही ठराविक ठिकाणीच छापेमारी केली जाते. इतर ठिकाणी जाण्याची हिंमत पालिका कर्मचारी दाखवत नाहीत.
पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर शहरात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्यांवर कारवाई केली जात नाही. काही मोठ्या दुकानदारांनी पार्कीगला जागच सोडली नाही. यामुळे ग्राहक रस्त्यावर वाहने पार्किंग करतात, यातून वाहतूक विस्कळीत होते. फुटपाथवर अतिक्रमण, कचरा, खड्डे याकडे लक्ष न देता किरकोळ गोष्टीकडे लक्ष देवून सर्वसामान्यांनाच त्रास दिला जात आहे.
संगमनेर शहरात किरकोळ विक्रेत्यांकडून किरकोळ प्रमाणात प्लास्टिक पिशव्या हस्तगत करून शहरात प्लास्टिक बंदी नियमाची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही. मोठे मासे सोडून किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा कशासाठी? मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःहुन कारवाई केल्यास शहरात प्लास्टिक वापराला कोणाचे आशीर्वाद आहेत, हेदेखील समोर येईल.
दीपक साळुंखे, सदस्य पथ विक्रेता समिती, संगमनेर,