

पुणे: वनाज ते रामवाडी मार्गावरील मेट्रो रेकमध्ये बिघाड निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ही सेवा ठप्प झाली. त्यामुळे रविवारच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची प्रचंड गैरसोय झाली. अवघ्या दोनच वर्षांपूर्वी पुणेकरांच्या सेवेत दाखल होत अल्पावधीतच पुणेकरांची जीवनवाहिनी ठरलेल्या मेट्रोने मात्र अचानक दगा दिल्याने तब्बल दोन तास प्रवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य घटक ठरत चाललेल्या पुणे मेट्रोच्या या पहिल्या बिघाडाने मेट्रोच्या तांत्रिक योग्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पुणे शहराच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारी वनाज ते रामवाडी ही मेट्रो तांत्रिक लाइन ॲक्वा लाइन (मार्गिका २) म्हणून ओळखली जाते. २३ जून २०१० ला महापालिकेच्या सभेत या मार्गिकेला मंजूरी मिळाली. त्यानंतर ८ डिसेंबर २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. १५.७५ किलोमीटर लांबीचा व १६ स्थानके असलेला हा मार्ग मार्च २०२४ मध्ये पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर दोन वर्षात सुमारे सव्वा ते दीड लाख प्रवासी या सेवेचा वापर करू लागले. रविवारी तर प्रवासी संख्येत दीड पटीने वाढ होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात या मार्गावर तीन कोटी ८८ लाख ७८ हजार २२३ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
रविवारी सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी येरवडा मेट्रोस्थानका जवळ एका मेट्रो रेकमध्ये अचानक विद्युतपुरवठा प्रणालीशी निगडित तांत्रिक बिघाड झाला व मेट्रोसेवा ठप्प झाली. मात्र, मेट्रो प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी ती पूर्ववत झाली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११:३८ वाजता संबंधित मेट्रो रेक रामवाडीकडून वनाजकडे जात होता. तो येरवडा स्थानकाजवळ पोहोचताच विद्युतपुरवठा प्रणालीत बिघाड झाला. त्यामुळे हा रेक जागीच बंद पडला. या घटनेची माहिती मिळताच मेट्रोच्या तांत्रिक विभागाने तातडीने या बिघाडाची तपासणी सुरू केली. तथापि, रेकमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांना मात्र त्रास झाला. तर, अनेक स्थानकांवर मेट्रोच्या प्रतीक्षेत थांबून राहिलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मेट्रोची तत्परता; अखेर मार्गिकेवरून रेक हटवला
प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प पडू नये, यासाठी सकाळी ११:५५ पासून आरटीओ पुणे ते रामवाडी या टप्प्यात एकाच मार्गिकेवरून मेट्रो वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला. या पर्यायी व्यवस्थेमुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मेट्रो कर्मचाऱ्यांनी बिघाड झालेला मेट्रो रेक सुरक्षितपणे मुख्य मार्गावरून बाजूला केला. त्यानंतर दुपारी १:३० वाजता हा बिघाड झालेला मेट्रो रेक रामवाडी मेट्रोस्थानका जवळ सुरक्षितपणे आणून उभा करण्यात आला.
बिघाडाची सखोल तपासणी सुरू
रेकमध्ये निर्माण झालेल्या या बिघाडाची सखोल तपासणी मेट्रोच्या तांत्रिक विभागाकडून सुरू असून, बिघाडाचे नेमके कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय योजनेवरही काम करण्यात येत आहे.
घटनाक्रम...
सकाळी ११:३८ वाजता : येरवडा स्थानकाजवळ वनाजच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो रेकच्या विद्युतपुरवठा प्रणालीत तांत्रिक बिघाड.
सकाळी ११:५५ वाजता : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओ (मंगळवारपेठ मेट्रोस्टेशन) पुणे ते रामवाडीदरम्यान सिंगल लाइन ऑपरेशन सुरू.
दुपारी १:३० वाजता : बिघाड झालेला मेट्रो रेक सुरक्षितपणे बाजूला करून रामवाडी मेट्रोस्थानकजवळ उभा करण्यात आला.
दुपारी १:३५ वाजता : मार्गिका २ वरील दोन्ही मार्गिकांवर मेट्रो वाहतूक सुरळीत सुरू.
एकूण प्रवासी संख्या, उत्पन्न
दर रविवारची दोन्ही मार्गिकेवरील एकूण प्रवासी संख्या आणि उत्पन्न २०२६
१ नोव्हेंबर २,३२,४९६ २९,४७,५७
८ नोव्हेंबर ९२,२८३ ११,१,३६
१५ नोव्हेंबर २,२०, ८८१ २६,९४,२९४
विलंबाबद्दल प्रशासनाकडून खेद
तांत्रिक बिघाडाने मेट्रो सेवा ठप्प होताच मेट्रो प्रशासनाने सर्व स्थानकांवर विलंबाबाबत खेद व्यक्त करणाऱ्या उद्घोषणा सुरू केल्या. अशा उद्घोषणा करण्याची वेळ प्रशासनावर पहिल्यांदाच आली. क्षमा याचना करणाऱ्या या उद्घोषणांमुळे विविध स्थानकांवर मेट्रोच्या प्रतीक्षेत थांबलेल्या शेकडो प्रवाशांनी प्रवासासाठी अन्य मार्गांचा पर्याय स्वीकारला.
रविवारी सकाळी ११:३८ वाजता येरवडा स्थानका जवळ वनाजच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो रेकच्या विद्युतपुरवठा प्रणालीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ११:५५ पासून आरटीओ ते रामवाडीदरम्यान सिंगल लाइनवरून वाहतूक सुरू ठेवली. कर्मचाऱ्यांनी बिघाड झालेला रेक सुरक्षितपणे बाजूला करून दुपारी दीड वाजता रामवाडी स्थानका जवळ उभा केला. त्यानंतर दोन्ही मार्गिकांवरील सेवा पूर्ववत करण्यात आली. या बिघाडाची तांत्रिक विभागाकडून तपासणी सुरू आहे.
चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो