

Pune Metro Vanaz Chandani Chowk to Ramwadi Wagholi route
प्रसाद जगताप
पुणे: केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला येत्या सहा महिन्यांत सुरुवात केली जाणार आहे. रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतुकीची मोठी गंभीर समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर हे काम पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी म्हणजेच सन 2029 उजाडणार आहे.
महामेट्रो प्रशासनाच्या वतीने चांदणी चौक, वाघोली मेट्रो मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये दोन स्वतंत्र ठेकेदार नियुक्त केले जाणार आहेत. मार्गिका (एलेव्हेटेड कॉरिडॉर) उभारणीसाठी एक ठेकेदार आणि मेट्रो स्थानकांच्या निर्मितीसाठी दुसरा ठेकेदार नियुक्त केला जाईल. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिमची आणि कोच विभागातील कामे पूर्ण करण्याचे नियोजन असणार आहे. यासाठीही महामेट्रो प्रशासनाकडून नियोजन केले जाणार आहे. (Latest Pune News)
सेगमेंट तयार करण्यासाठी कास्टिंग यार्डही बनविण्यात येणार
सर्वप्रथम मार्गिका बनविण्यासाठीची निविदा प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर लगेचच स्थानक उभारणीसाठीची प्रक्रिया राबविण्यात येईल. कामाला सुरुवात करण्यापूर्वी मार्गिकेसाठी निश्चित केलेल्या जागांची पाहणी केली जाणार असून, सेगमेंट तयार करण्यासाठी कास्टिंग यार्डही बनविण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीचे नियोजन
वाघोली भागातील सध्याची वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रोच्या कामामुळे ती आणखी वाढेल का? अशी चिंता येथील स्थानिक वाहनचालकांना सतावत आहे. याबद्दल बोलताना महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी आश्वस्त केले की, वाहनचालकांना मेट्रोच्या कामामुळे कोणतीही अडचण येणार नाही. वाहतूक पोलिसांच्या मदतीने कामाचे व्यवस्थित नियोजन केले जाईल. आम्ही मध्यवस्तीतील मंडईसारख्या गर्दीच्या ठिकाणीही वाहनचालकांना कोणताही त्रास न होऊ देता काम केले आहे. वाघोलीतील कामाचेही असेच योग्यरीतीने नियोजन केले जाईल.
वाघोली मेट्रो मार्गिकेचे काम पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. आम्ही कामादरम्यान नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊ. तसेच, चांदणी चौक आणि वाघोली मेट्रो मार्गिकांसाठीच्या कामासाठी लगेचच निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर आगामी सहा महिन्यांत या दोन्ही मार्गिकांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुढील 4 वर्षांच्या कालावधीत दोन्ही मार्गिका प्रवासी सेवेत असतील.
- हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक तथा कार्यकारी संचालक, महामेट्रो
वाघोलीत सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी असते. मेट्रो येणार ही चांगली गोष्ट आहे. पण, काम सुरू झाल्यावर कोंडी अजून वाढेल की काय? अशी भीती वाटते. जर अधिकारी व्यवस्थित नियोजन करणार असतील, तर नक्कीच याचा फायदा होईल.
- अॅड. पृथ्वीराज थोरात, दररोज वाघोलीतून प्रवास करणारे वाहनचालक