Pune Metro : पुणेकरांच्या आनंदात भर ! मेट्रो प्रवासाने वाचतोय अर्धा तास..

Pune Metro : पुणेकरांच्या आनंदात भर ! मेट्रो प्रवासाने वाचतोय अर्धा तास..
Published on
Updated on

पुणे : शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त नगर रस्त्यावरून कोथरूडकडे किंवा त्याच्या उलट दिशेने तुम्ही प्रवास करीत असाल तर प्रचंड त्रासाचा आणि वेळखाऊ प्रवासाचा अनुभव घेतलाच असणार. आता हाच प्रवास मेट्रोने आनंददायी आणि सुखकर बनवला आहे. वनाज ते रामवाडीदरम्यान मेट्रोच्या प्रवासापेक्षा 28 मिनिटांहून अधिकचा कालावधी हा दुचाकीला लागतो, दैनिक 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत हे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच रुबी हॉल ते रामवाडी या सव्वापाच किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण झाले. त्यामुळे आता कल्याणीनगर, वडगाव शेरी, नगर रस्ता, येरवडा या भागातील नागरिकांना मेट्रोमुळे प्रवास आनंददायी झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या काही दिवसांमध्येच दोन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. दरम्यान, दैनिक पुढारीच्या प्रतिनिधींनी वनाज ते रामवाडी मेट्रोने आणि हेच अंतर दुचाकीने प्रवास केला.

दुचाकीच्या प्रवासाला एक तास 7 मिनिटांचा वेळ लागला. त्याच मार्गावर मेट्रोने केवळ 39 मिनिटे एवढाच वेळ लागला. म्हणजे 28 मिनिटे अधिकचा वेळ दुचाकीला लागला. पण केवळ वेळच नाही तर दुचाकीवर प्रवास करताना रस्त्यावरील प्रदूषण, ऊन आणि सर्वात तापदायक म्हणजे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. त्या तुलनेत मेट्रोमध्ये यापैकी कोणत्याही त्रासाची झळ बसली नाही. वनाजवरून सायंकाळी चार वाजून 36 मिनिटांनी निघालेली मेट्रो सोळा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पाच वाजून 15 मिनिटांनी पोहचली. दरम्यान, वनाजपासून ते रामवाडीपर्यंत एकूण सोळा स्थानके आहेत. त्यातील गरवारे महाविद्यालय, सिव्हिल कोर्ट, रूबी हॉल स्थानकावरून कल्याणी नगर आणि रामवाडीला जाणारे प्रवासी अधिक असल्याचे दिसून आले. दुचाकीवरून वनाजपासून पाच वाचून सहा मिनिटांनी निघालो. पहिलाच सिग्नल लागला तो गुजरात कॉलनीचा. पण हा छोटा सिग्नल होता.

आनंदनगर, मोरे विद्यालयाच्या पुढे पौड फाटा येथे मोठा सिग्नल होता, जवळपास दोन मिनिटे थांबावे लागले. नळस्टॉप येथील उड्डाणपुलावरून खाली उतरताना खालच्या बाजूने येणार्‍या वाहनांसाठी पुलामुळे अरुंद झालेल्या रस्त्याने काहीशी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसले. बाजूला लावलेली चारचाकी वाहने रस्त्यावरून काढताना थांबलेल्या वाहनांमधून रस्ता काढत पुढे गरवारे महाविद्यालयाच्या सिग्नलवर थोडावेळ थांबल्यानंतर पुढे खंडुजीबाबा चौकामध्ये दीड मिनिटे थांबल्यानंतर गाडी पुढे सरकली. त्यापुढे नामदार गोखले चौकात (गुडलक) नेहमीपेक्षा लवकर पुढे जाता आले. परंतु, गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन) नेहमीप्रमाणे गाडीचा वेग मंदावला. खरेदीसाठी रस्ता ओलांडणारे नागरिक आणि वाहने पार्किंग करण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांमुळे गाडी केवळ दहा ते पंधराच्या वेगाने चालवावी लागली.

त्यानंतर पुढे कृषी महाविद्यालयाच्या सिग्नलवर थांबावे लागले, त्यानंतर शिवाजीनगरच्या सिग्नलला जवळपास चार मिनिटे थांबावे लागले. कारण, मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पुढे आरटीओच्या चौकातील सिग्नलवर पोहोचल्याबरोबर सिग्नल हिरवा झाल्याने जास्त वेळ थांबावे लागले नाही. जहांगिर हॉस्पिटल, वाडिया महाविद्यालय, येरवड्यातील गुंजन चौक आणि शास्त्रीनगर चौकात देखील कमी- अधिक प्रमाणात थांबावे लागले. वाहतूक कोंडीतून रस्ता काढत रस्त्याच्या बाजूलाच अचानक थांबणार्‍या चारचाकींमधून रस्ता काढत रामवाडीत सहा वाजून 13 मिनिटांनी पोहोचलो.

  • वनाज ते रामवाडी मेट्रोने केलेल्या प्रवासाचा
    कालावधी 39 मिनिटे
  • वनाज ते रामवाडी दुचाकीने केलेल्या प्रवासाचा
    कालावधी 1 तास 7 मिनिटे
  • दुचाकी वापरणार्‍यांनी
    सुरू केला मेट्रोने प्रवास
  • विद्यार्थ्यांसाठी मेट्रो
    ठरतेय सोईस्कर
  • मेट्रोचा वातानुकूलित प्रवास
    वाहतूक कोंडीतून
    होतेय सुटका

मी प्रभात रस्त्यावर नोकरीसाठी जातो. मेट्रो सुरू होण्याची आम्ही वाटच बघत होतो. मुळीकनगरमध्ये राहण्यास असून रामवाडीतून मेट्रोने प्रवास करून प्रभात रस्त्यावरील ऑफिसला जातो. वेळेची बचत होतेच, पण प्रवास आरामदायी होत आहे.

– गजानन साळुंखे, प्रवासी

डेक्कनमध्ये सॉफ्टवेअरच्या क्लाससाठी मी दररोज मेट्रोने प्रवास करत आहे. मेट्रोने प्रवास करण्यास सुरुवात केल्यापासून माझी प्रवासात जात असलेल्या वेळेची बचत झाली. त्याशिवाय या मेट्रोमधून प्रवास करताना वाचन देखील होते.

– अनिकेत शिंदे, विद्यार्थी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news