

पुणे: काँग्रेस आणि ‘इंडी’ आघाडीने ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ आणि परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला विरोध करून केवळ महिलांचाच नव्हे, तर महाराष्ट्रातील तमाम मतदारांच्या हक्कांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी केला.
शहर भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या बोलत होते. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सूर्या म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महिलांना हक्क देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत.
1996 पासून 2026 पर्यंत तब्बल पाच वेळा हे विधेयक संसदेत आले, पण दरवेळी काँग्रेसच्या विरोधामुळे ते रखडले.’ आगामी काळात हे विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाईल आणि तेव्हा कोणामध्येही त्याला विरोध करण्याचे धाडस उरणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या 24 जागांचे नुकसान
ते म्हणाले, ‘या विधेयकामुळे महाराष्ट्राला 24 अतिरिक्त जागा मिळाल्या असत्या, ज्यामुळे राज्याचे केंद्रातील वजन वाढले असते. मात्र, विरोधकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या हक्कावर गदा आली आहे.