

शंकर कवडे
पुणे: शेवग्याच्या भावातील तेजीमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने भावात घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. देशासह परराज्यातून आवक वाढल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. तर मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने लसूण आणि टोमॅटोचे भावही दहा टक्क्यांनी वधारले आहे.
मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
बाजारात रविवारी (दि. 14) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेलया आवकमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा 2 टेम्पो राजस्थानातून गाजर 9 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 4 टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग 2 टेम्पो, मध्यप्रदेश येथून मटार 30 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी 250 ते 300 क्रेट्स, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 5 ते 6 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 60 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, घेवडा 3 ते 4 टेम्पो, पावटा 4 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
आवक वाढूनही पालेभाज्यांच्या भावात वाढ
मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, त्यापेक्षा मागणी जास्त असल्याने कोथिंबीर, पालक, मेथी, कांदापात, शेपू आणि पुदिनाच्या भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि पालकच्या भावात सर्वाधिक जुडीमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे. तर त्याखालोखाल मेथीच्या भावात 4 रुपये, कांदापातच्या भावात 3 रुपये, शेपू आणि पुदिनाच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मागील रविवारी (दि.7) कोथिंबिरीची दीड लाख जुडी आवक झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन आज (दि.14) 1 लाख 90 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. तर मागील रविवारी 50 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज 80 हजार जुडी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.