

पुणे : येवलेवाडीतील एका लॉजवर महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे कळताच कोंढवा पोलिसांनी धाड टाकून दोन महिलांची सुटका केली, तर दोन एजंटना अटक केली आहे. रवी छोटे गौडा (वय ४६, रा. सासवड रोड, येवलेवाडी) तसेच सचिन प्रकाश काळे (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. रवी गौडा याचे बोपदेव घाट भागात हॉटेल साई बालाजी लॉजिंग नावाने लॉज आहे. त्या ठिकाणी सचिन काळे हा कामगार म्हणून काम करीत होता. दरम्यान, अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यानुसार कोंढवा पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलिस हवालदार अमोल हिरवे यांना साई बालाजी लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पथकाने धाड टाकून दोन महिलांची सुटका केली.
तसेच, रवी गौडा व सचिन काळे यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण, पोलिस हवालदार अमोल हिरवे, स्वागत पळसे आणि त्यांच्या पथकाने केली.