

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana
पुणे : लाडकी बहीण योजनेचे बजेट दुसऱ्या कोणत्याही योजनांमधून वळविलेले नाही, ते स्वतंत्र निर्माण केले आहे. तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर प्रकरणात तथ्य असलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली जाईल. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना आपण लेखानेच पुराव्यानिशी उत्तर दिले आहे. त्यामुळे आतातरी त्यांनी शहाणे व्हावे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
महाऊर्जा कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस पुणे शहरात आले होते. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांनी त्यांना गाठले. या वेळी लाडकी बहीण योजना, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीबाबत केलेल्या आरोपांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेतील निधी सामाजिक विभागाच्या एसस्सी, एसटी योजनेतून वळविलेला नाही. लाडकी बहीण योजनेचे स्वतंत्र बजेट केले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मीदेखील आता हे तिसऱ्यांदा सांगत आहे.
कारागृहाचे तत्कालीन अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांचे नाव विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर भ्रष्टाचार प्रकरणात आले आहे. या प्रश्ऩावर मुख्यमंत्री म्हणाले की, यात तथ्य असलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली जाईल. तसेच 'सामना'मधून आज पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. यावर मिश्किल हास्य करीत ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत 'सामना'चे अस्तित्व होते.