

राजगुरुनगर: शेतकर्याने फार्मर आयडी कार्ड काढले असेल तरच शेतीचे पंचनामे करा, फार्मर आयडी असणार्यांनाच शासनाचे अनुदानाचे बी-बियाणे व खते मिळतील असा अजब ’फतवा’ (निर्णय) शासनाने काढला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मदतीऐवजी अडचणीत टाकणारा तसेच डोकेदुखी होणारा हा शासन निर्णय ठरत आहे.
नवीन नियमानुसार केंद्र सरकारच्या ‘अॅग्री स्टॅक’ योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शेतकर्याला आपली शेतजमीन आधारकार्डशी संलग्न करून ‘फार्मर युनिक आयडी’ घ्यावा लागतो. हा आयडी नसल्यास पीएम किसान, पीकविमा, अनुदानित बियाणे व खते यांसारख्या कोणत्याही योजना मिळणार नाहीत. (Latest Pune News)
जिल्ह्यात फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. परंतु हे फार्मर आयडी काढताना संकेतस्थळावर शेतकर्यांचे नाव येत नाही, कधी सातबाराच दिसत नाही, तर कधी गट क्रमांक येत नाही.
याशिवाय हा अर्ज भरताना दोन भाषेत मराठी आणि इंग्रजी भाषेत अर्ज भरायचा असल्याने मराठी नाव टाकले तर इंग्रजी नाव मॅच होत नाही, त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील अर्ज सबमीट होत नाही व आयडी निघत नाही.
याशिवाय अनेक तांत्रिक आडचणी येत आहेत. यामध्ये सातबार्याचा जुना डाटा अपलोड केला आहे. त्यामुळेच गेले एक-दीड वर्षातील खरेदीखत, वारस नोंदी झालेल्या शेतकर्यांची नावे फार्मर आयडी संकेतस्थळावर दिसत नाही.
त्यामुळे बहुतांश शेतकर्यांचे फार्मर आयडी निघाले नाहीत. असे असताना आणि पावसाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पंचनामे करण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करणे हे चुकीचे आहे. या निर्णयामुळे मदतीपासून वंचित राहण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.