

पुणे: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक येथील केंद्रांवर मतदान झाले. पुण्यातील स. प. महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, पडद्यामागील कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी मतदानाचा हक्क बजावला.
पुणे केंद्रावर एकूण ६३.१० टक्के मतदानाची नोंद झाली. पुण्यातील ७२९ मतदारांपैकी ४६० मतदारांनी मतदान केले. मतदानावेळी प्रचार करण्यात आल्याने काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पडली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत ४६० जणांनी मतदान केले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या सोमवारी (दि. ८) म्हणजेच आज कोल्हापूर येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
नव्याने निवडून येणाऱ्या कार्यकारिणीवर मराठी चित्रपटसृष्टीच्या पुढील वाटचालीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. दहा वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. महामंडळाची धुरा कोणत्या पॅनेलकडे जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
पुणे केंद्रावर या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
पुणे मतदान केंद्रावर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांनी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, अभिनेत्री वर्षा उसगावकर, सुवर्णा काळे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चेतन दळवी, माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, जगन्नाथ निवंगुणे, विजय चौधरी, अनिल नगरकर, सतीश रणदिवे, आनंद काळे, भाऊसाहेब भोईर, सुनील महाजन, अनिल धुमाळ, अनिल जाधव, पितांबर काळे यांचा समावेश होता.