

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी पुणे शहरात गोंधळाचीच चर्चा रंगली. मतदार याद्यांतील त्रुटी, मतदान प्रक्रियेतील तांत्रिक चुका आणि बोगस तसेच दुबार मतदानाच्या घटनांमुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांचा गोंधळ उडाला. परिणामी, प्रशासनासह निवडणूक कर्मचाऱ्यांनाही मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला.
शहरातील अनेक भागांत एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रांदरम्यान हेलपाटे मारताना दिसले. काही ठिकाणी मतदारांनी मतदान केल्यानंतर बोटावर लावलेली शाई काही वेळातच पुसली जात असल्याच्या तक्रारीही नोंदवल्या.
यामुळे पुन्हा मतदान होण्याची शक्यता निर्माण होत असल्याने मतदारांमध्ये संशय आणि असंतोष व्यक्त करण्यात आला. याशिवाय, भलत्याच व्यक्तीने इतरांच्या नावावर मतदान केल्याचे प्रकार काही मतदान केंद्रांवर उघडकीस आले. दाम्पत्यांपैकी मयत व्यक्तीचे मतदार यादीत नाव आणि हयात व्यक्तीचे नावच नाही, असेही चित्र काही ठिकाणी होते.
दुबार नाव नोंद असल्यामुळे अनेक मतदारांना अर्ज भरून स्वतंत्र प्रक्रिया पार पाडावी लागली. त्यामुळे मतदानाचा वेग मंदावला आणि रांगा वाढल्या. काही केंद्रांवर प्रवर्गनिहाय मतदान यंत्रे चुकीच्या क्रमाने ठेवण्यात आल्यानेही मतदार संभमात पडले.
या सर्व गोंधळाचा थेट फटका सामान्य मतदारांना बसला. दरम्यान, निवडणूक प्रशासनाने तक्रारींची दखल घेत संबंधित ठिकाणी तत्काळ दुरुस्ती आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदान प्रक्रियेदरम्यान एकामागो -माग उघड होत गेलेल्या त्रुटींमुळे यंदाचे पुण्यातील मतदान गोंधळानेच गाजल्याचे चित्र निर्माण झाले होते.