

पुणे: औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. या अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 सूस, पाषाण, बाणेरमध्ये दुपारी 3.30 पर्यंत 28.24 तर प्रभाग क्रमांक 8 औंध व बोपोडीसाठी 21.60 टक्के मतदान झाले. सकाळी काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानाला उशिरा सुरुवात झाली. तर काही केंद्रांवर प्रशासनाने योग्य सुविधा पुरवल्या नसल्याने मतदारांना त्रास सहन करावा लागला.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 आणि 9 साठी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. 10 पर्यंत मतदारांचा ओघ कायम होता. मात्र, ऊन वाढल्याने ही गर्दी कमी झाली. दुपारी 12 नंतर फार तुरळक गर्दी मतदान केंद्रांवर होती. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या लोकांनी रिक्षा तसेच गाड्यांची सुविधा केली होती. काही मतदान केंद्र मुख्य रस्त्यापासून आत असल्याने अनेक मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचतांना मनस्ताप झाला. भरउन्हात त्यांना केंद्रापर्यंत पायी चालत जावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मतदान केंद्रांवर व्हीलचेअर नसल्याने देखील त्यांची गैरसोय झाली. पाषाण गावातील काही मतदान केंद्र खूप आत होते. पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना केंद्रावर नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. मात्र, येथील मतदान केंद्र हे गल्लीबोळात असल्याने त्यांना चालतच केंद्रावर जावे लागले. काही मतदारांच्या कुटुंबीयांची नावे वेगवेगळ्या प्रभागात आल्याने नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने मतदार याद्या तयार करताना घोळ घातल्याने त्यांना हा त्रास झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मतदान केंद्र लांब असल्याने गोंधळ
पक्षाने मतदान केंद्राबाहेर मतदान स्लिप देण्यासाठी स्टॉल लावले होते. या स्टॉलवर हाती स्लिप मिळाल्यावर आपले मतदान केंद्र दुसऱ्या ठिकाणी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. भरउन्हात मतदान केंद्र शोधतांना काही मतदारांची दमछाक झाली. काही मतदारांची नावे ही दुसऱ्या प्रभागात गेल्याचे कळल्याने प्रशासनाला दोष देत ते मतदान न करता माघारी गेले.
आम्ही मतदान करण्यासाठी पाषाण येथील मतदान केंद्रांवर आलो. मात्र, हे मतदान केंद्र मुख्य रस्त्यापासून खूप आत होते. माझ्या सोबत माझे वृद्ध वडील होते. त्यांना चालता येत नसल्याने आम्ही व्हीलचेअरची मागणी केली. मात्र, मुख्य रस्त्यावर यायला केंद्रावरील कर्मचारी तयार नव्हते. आम्ही कसेबसे मतदान केंद्रांवर पोहोचलो. केंद्रांवर एकच व्हीलचेअर असल्याने आम्हाला वाट पाहावी लागली.
अभिजीत महाजन, मतदार