

पुणे: कसबा क्षेत्रीय कार्यालयांतर्गतच्या प्रभाग क्रमांक 25मध्ये मतदानाच्या काळात सकाळीच मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. कारण मतदान कोणालाही केले तरी संबंधित मतदान कमळालाच जात असल्याची तक्रार मतदारांनी केली. त्यानंतर याठिकाणी मनसेचे गणेश भोकरे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार ॲड. रूपाली ठोंबरे यांनी भेट दिली आणि त्याठिकाणी तांत्रिक अडचणी आलेल्या दोन मशीन बंद करून त्याठिकाणी नवीन मशीन बसविण्यात प्रशासनाला भाग पाडले आणि मतदान प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट झाले.
या संदर्भात मनसेचे गणेश भोकरे म्हणाले, आमच्या एका ताईने मतदान केले. यामध्ये कुठलेही बटण दाबले तरी भाजपला मत जात होते. त्यांनी अनेक वेळा मतदान करून पाहिले, परंतु केवळ कमळाच्या चिन्हासमोरील लाईट लागत होती. अन्य कोणतीही लाईट लागत नव्हती. अशाप्रकारे 200 ते 250 मतदान झाले. यामध्ये मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले तरीदेखील मशीन बदलली नाही. यामध्ये अधिकाऱ्यांचे देखील संगनमत असल्याचा आरोप भोकरे यांनी केला. काही मतदान केंद्रांवर कंट्रोल एरर, बॅलेट एरर आल्याचे अधिकारी सांगतात मग त्यांनी मशीन चेक का केल्या नाहीत, असा प्रश्न ॲड. रूपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला. दरम्यान, यासंदर्भातील लेखी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का?
ॲड. रुपाली ठोंबरे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 25 मधील मतदार याद्या फोडण्यात आल्या. त्यानंतर साडेसात वाजता मतदान सुरू होणे अपेक्षित असताना साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सुरू करण्यात आले. त्यानंतर मशीन अ, ब, क, ड अशा क्रमाने लावणे अपेक्षित असताना ड, क, ब, अ अशा प्रकारे मशीन लावण्यात आल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडला आहे.
महर्षी अण्णासाहेब शिंदे प्राथमिक विद्यालयाच्या खोली क्रमांक 9 मध्ये माझे मतदान होते. तेथे गेल्यावर मला सांगण्यात आले की तुम्ही मतदान केले आहे. मी घाबरलो व म्हणालो, अहो, मी मतदान केलेच नाही, माझे हात दाखवले. खूप भांडल्यावर शेवटी अधिकाऱ्यांनी माझ्याकडून अर्ज लिहून घेतला. शेवटी मला मतदान करता आले.
प्रशांत वाघ, घोरपडे पेठ
प्रभाग क्रमांक 26 मध्ये माझे मतदान आहे. परंतु दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान माझ्या नावावर आधीच कुणीतरी मतदान करून गेल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे मला मतदान करता आले नाही.
मनीषा माहदेवीया, प्रभाग क्रमांक 26
मतदान केंद्रावर आल्यावर समजले की, मध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही. तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला मोबाईल ठेवायला सांगितला असता त्यांनी थेट नकार दिला. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठांनी मोबाईल कुठे ठेवावा हा प्रश्न आहे. इथूनपुढे प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था करावी.
युवराज बेलारे, रामबाग कॉलनी
लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये असलेले मतदान केंद्र या वेळी बदलण्यात आले. या वेळी घरापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर मतदानाचे केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे अनेक मतदारांना त्याचा फटका बसल्याचे दिसून आले.
अनिल पोपट जगताप, मांजरी फार्म
हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नव्याने आलेल्या प्रभाग 15 मध्ये एक-दोन ठिकाणी नागरिकांना आपल्या मतदान केंद्राचा शोध घेण्यासाठी धावपळ करावी लागली. अनेक ठिकाणी मतदारांना माहितीदर्शक फलकही पाहायला मिळाले नाहीत.
रिकेंश रवींद्र बनसोडे, महादेवनगर