

पुणे: नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला फुरसुंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राहुल उत्तम पठारे (वय 39, रा. होळकरवाडी) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले 6 लाख 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पाच तोळ्याचे दागिने जप्त केले होते. त्याने हे दागिने एका सोनाराला विकले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, होळकरवाडी येथील अभिजित पठारे यांच्या घरात चोरी झाली होती. विवाहानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्याचा ऐवज चोरी केला होता. दरम्यान, याप्रकरणी अभिजित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलिस कर्मचारी सागर वणवे आणि अभिजित टिळेकर यांना ही चोरी राहुल पठारे याने केली असून, काही सोने महंमदवाडी येथील एका सराफी पेढीत विकल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. चौकशीत राहुलने सांगितले की, त्याला नर्तकीसोबतच्या बैठकीचा आणि नाचगाण्याचा छंद आहे. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. फिर्यादी अभिजित आणि आरोपी राहुल हे एकाच परिसरात राहतात. राहुलचे अभिजितच्या घरी येणे-जाणे असते. त्यातूनच त्याने संधी मिळताच अभिजित यांच्या घरातून सोन्याचा ऐवज चोरी केला.
पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, कर्मचारी महेश नलवडे, नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, हरिदास कदम, सतीश काळे यांच्या पथकाने केली.
असा झाला घरफोडीचा उलगडा...
सुरुवातीला राहुलबाबत कोणी काही बोलायला तयार नव्हते. परंतु, पोलिसांनी तांत्रिक विर्श्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत तपास करून राहुलला असलेल्या नर्तकीच्या छंदाची माहिती गोळा केली. त्यातूनच पुढे या घरफोडीचा उलगडा झाला. चोरीच्या ऐवजाबाबत राहुलला विचारले असता त्याने सांगितले की, चोरीतील काही सोने महंमदवाडी येथील एका सराफी पेढीत विक्री केली आहे. त्यातून आलेले 30 हजार रुपये स्वतःवर खर्च केले होते.