

पुणे: आम्ही मूळ सांगलीचे... कोलकाता येथे आम्ही फिरायला गेलो होतो, फिरून झाल्यावर गुरुवारी (दि.04) मध्यरात्री 12 वाजताची आमची इंडिगोची फ्लाइट पुण्यासाठी होती. मात्र, तिने पूर्ण 12 तास उलटल्यानंतर शुक्रवारी (दि.05) दुपारी 12 वाजता कोलकाताहून पुण्याकडे उड्डाण केले. तब्बल 12 तास आम्हाला कोलकाता विमानतळावर प्रतीक्षा करावी लागली, त्यामुळे आम्ही अक्षरश: हैराण झालो, असे सांगत होते, कोलकाता-पुणे विमानाचे प्रवासी दिलीप करंदीकर.
ते म्हणाले, आम्ही ग्रुपने कोलकाता येथे फिरण्यासाठी गेलो होतो. आमची तेथील ट्रिप खूप छान झाली. मात्र, परतताना विमान उड्डाणांच्या या गोंधळाने ट्रिपचा घरी परततानाचा शेवट खूपच खराब गेला.
इंडिगोने आमच्यासारख्या अनेक प्रवाशांना अशी सुविधा देत अक्षरशः वेठीस धरले. अशा सुविधेमुळे आम्हाला तीव संताप आला आहे. दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने पुणे विमानतळावर या त्रस्त प्रवाशांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी आपला अनुभव यावेळी कथन केला.
कोलकाताहून पुण्याकडे आमची फ्लाइट मध्यरात्री 12 वाजताची होती, पण ती दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजताच आली. कोलकाता विमानतळावर प्रतीक्षा करून आम्ही अक्षरश: हैराण झालो. त्यानंतर प्रवास आणि विमानात बसतानाही खूप दगदग झाली. विमान कंपनीने अशा चुका पुन्हा करू नयेत आणि या चुकीबाबत शासनाने कंपनीवर मोठी कारवाई करावी.
स्वाती करंदीकर, विमान प्रवासी
कोलकाता फिरल्यामुळे आम्ही अगोदरच थकलो होतो, घरी जायची ओढ होती. त्यात परत जाताना हा असा अनुभव मिळेल, असे वाटले नव्हते. विमानाच्या विलंबामुळे पुढची सर्व कामे रखडली. आता येथूनपुढे सांगलीपर्यंतचा प्रवासही बायरोड करायचा आहे. आताच खूप दमलो आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांचा विचार करून कामाचे नियोजन करावे, अशाप्रकारे विस्कळीत नियोजन करून प्रवाशांना वेठीस धरू नये.
जयंत फाटक, भास्कर साळुंखे, विमान प्रवासी