

पौडरोड: रस्त्यावर श्वानांची घाण हा मुद्दा अलीकडे महत्त्वाचा बनला आहे. त्याकडे गांभीर्याने पाहात कोथरूड - बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडून श्वानाने रस्त्यावर घाण केल्यावरून 10 श्वानमालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये वसूल करत त्यांना गुलाबपुष्प देत रस्त्यावर श्वानांकडून घाण केली जाऊ नये, याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
आपल्या पाळलेल्या श्वानांसोबत सकाळ-संध्याकाळ फिरणे हा कोथरूड-बावधन परिसरातील अनेक पुणेकरांचा शिरस्ता बनलेला आहे. विशेषतः कोथरूड उपनगरातील डहाणूकर कॉलनी, कमिन्स रस्ता, गोपीनाथनगर, कुमार परिसर, गांधी भवन, एकलव्य कॉलेज, आशिष गार्डन, डी. पी. रस्ता, गाढवे कॉलनी, परमहंसनगर, म्हातोबानगर, उत्सव, शिवतीर्थनगर इत्यादी परिसरातील दररोज सकाळ-सायंकाळी रस्ते व अंतर्गत रस्ते, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी श्वानासोबत फिरणारे नागरिक हे चित्र नित्याचे झाले आहे.
मात्र, या श्वानांकडून रस्त्यावर बऱ्याचदा घाण केली जाते, त्याकडे बेफिकीरपणे पाहात घाण स्वच्छ न करता पुणेकर तेथून निघून जात असल्याचे आढळले आहे.
कोथरूड परिसरामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात अनेका नागरिकांकडून याबाबत महानगरपालिकेकडे ऑनलाइन तक्रारी आल्या आहेत. रस्त्यावर घाण करणाऱ्या श्वानांमुळे आणि त्याबाबत बेफिकिरी दाखवणाऱ्या नागरिकांमुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असल्याने अशा श्वानमालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्या तक्रारीतून करण्यात आली आहे.
त्याची दखल घेत कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे व गणेश खिरीड यांनी अशा बेफिकीर श्वानमालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने कोथरूड भागातील सर्व आरोग्य कोठ्यांवरील आरोग्य निरीक्षक, मुकादम व एक सेवक असे पथक नेमून जनजागृती व दंडात्मक कारवाई तीव करण्यात येत आहे.