

पुणे : शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली राजरोसपणे देहविक्रयची दुकाने सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सोमवारी (दि. 7) पोरवाल रोड, धानोरी परिसरातील लक्स स्पा सेंटरवर कारवाई केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विमानतळ आणि बाणेर पोलिसांच्या पथकांनी मंगळवारी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. दरम्यान, पोरवाल रोड येथील स्पामध्ये दोन अल्पवयीन मुलींना आर्थिक प्रलोभन दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर देखील एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार निदर्शनास आले तर संबंधित अधिकार्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही पोलिस आयुक्तांनी चौकी प्रभारी अधिकार्यांनासुद्धा मागील काही बैठकांमध्ये याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर देखील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून निदर्शनास आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कडक भूमिकेमुळे एकेकाळी शहरात फोफावलेल्या स्पा सेंटरमधील गैरप्रकारांना काही प्रमाणात आळा बसला आहे. परंतु, अनेक ठिकाणी चोरीछुपे स्पा सेंटरमध्ये मसाज आणि इतर सेवांच्या नावाखाली देहविक्रय केले जात असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने या व्यवसायायात ठरावीक देशातील विदेशी तरुणी आढळून येतात. पर्यटन किंवा अन्य व्हिसावर भारतात आल्यानंतर त्यांच्याकडून स्पा सेंटरमध्ये थेअरपिस्ट म्हणून काम सुरू केले जाते. तेथे अतिरिक्त सेवांच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी तरुणींना स्पामालक आणि मॅनेजरकडून प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांच्या कारवायातून दिसते.
याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात जागामालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा मॅनेजर अब्बास अब्दुल मतीन हुसेन (वय 21), मालक नितीन बेगडे (चाकण), धर्मराज नागनाथ उबाळे (वय 31, रा. औसा, लातूर), जागामालक पांडुरंग गणपत कळमकर (रा. बालेवाडी फाटा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्पा मॅनेजर आणि स्पामालक यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. तर कळमकर याने भाडेकरूबाबत जवळच्या पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची माहिती न देता स्वतःची जागा वेश्याव्यवसायासाठी उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. पोलिस उपायुक्त सोमय मुंढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हा कारवाई केली.
गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक पोलिसांनी मिळून सन 2022 ते जून 2025 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत 105 पेक्षा अधिक स्पा सेंटरवर कारवाई केली आहे. त्यामध्ये 159 जणांना अटक केली आहे. स्पा मॅनेजर, मालक आदी लोकांचा यामध्ये सहभाग असून, महिला आरोपी 51, तर पुरुषांची संख्या 108 आहे. दरम्यानच्या कारवायांमध्ये 271 भारतीय आणि 49 पेक्षा अधिक विदेशी तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. परंतु, असे असले तरी शहरात असलेली स्पा सेंटरची संख्या आणि तेथे चालणारे गैरप्रकार यांच्या तुलनेत ही कारवाई तोकडीच असल्याचे दिसून येते.
पोरवाल रोड येथील स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या कारवाईत दोन अल्पवयीन मुलींसह पाच तरुणींची सुटका करण्यात आली. दरम्यान, स्पामालक, मॅनेजर आरोपी महिलेने आर्थिक प्रलोभन दाखवून आईसह तिच्या अल्पवयीन मुलीला देहविक्रय व्यवसायात ढकलल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी किरण बाबूराव आडे ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय 28, रा. राधे निवास, लेन क्र. 6, खराडी) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
विमानतळ पोलिसांनी मंगळवारी (दि. 8) सायंकाळी दत्त मंदिर चौक विमानतळ येथील मेन्शन स्पा सेंटरवर छापा टाकला. या वेळी येथून तब्बल 16 तरुणींची सुटका केली. त्यामध्ये दहा तरुणी विदेशी आहेत. मसाज सेंटरच्या नावाखाली मेन्शन स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार, स्पा मॅनेजर कुणाल दत्तात्रय घोडके (वय 31), जुनैद शेख आणि सुनील चव्हाण या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.