पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात चालू वर्षातील अडीच महिन्यांत गोळीबाराच्या बावीस घटना घडल्या. वाहन तोडफोड आणि कोयताधारी टोळक्याचा धुडगूस वेगळाच. 'सुरक्षित शहर' अशी ओळख असलेल्या पुण्यात ओठांवर मिसरूड न फुटलेली पोरं अगदीच किरकोळ कारणांतून कोयत्याचे वार अन् बंदुकीचे बार काढू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे शहरातील वास्तव आहे.
दोन दिवसांपूर्वी कात्रज भागात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मुलांनी गावठी पिस्तूल काढत गोळी झाडली. सुदैवाने ती कोणाला लागली नाही. त्यानंतर टोळक्याने कोयत्याने वार करून दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला. कात्रजमधील संतोषनगर घुंगरूवाला चाळ
येथे क्रिकेटच्या वादातून अल्पवयीन अन् विशीतील मुलांमध्ये वादावादी झाली. हे वाद विकोपाला गेले अन् मिटलेल्या वादानंतर देखील आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने पुन्हा दोन मुलांना गाठत हल्ला केला. त्या वेळी एका सराइतावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने गोळीबार करताना अडविल्याने गोळी रोडवर उडाली अन् बार उडताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला गेला.
शहरात अधूनमधून गोळीबाराचा बार उडत कोयत्याने दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. थोडे वाद होताच शाळेतील पोरं देखील आता कोयता हातात घेत आहेत. मध्य भागात शाळांमधील पोरांमध्ये वाद झाल्यानंतर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली होती. तर, पिस्तूल दाखवत धमकावून देखील लुटल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. गोळीबार करून दहशत माजविण्याचे प्रकार आणि गोळीबाराच्या घटना नित्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगार व टोळ्यांची झाडाझडती घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पिस्तूल विक्रेते व पिस्तूल बाळगणार्यांची यादी तयार करून परेड घेतली. तसेच, पिस्तूल पुरवठादार देखील रडावर घेतले. तरीही शहरात अवैध पिस्तुलांचा सुळसुळाट असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणांकडे गावठी पिस्तुले आढळून येत आहेत. विशेष म्हणजे, तडीपार गुंडांकडे देखील पिस्तूल दिसत आहेत. त्यामुळे पिस्तूल संस्कृतीला रोखणार कसे? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
गुन्हेगारीत पाय ठेवलेल्या तसेच नवख्या गुन्हेगारांमध्ये पिस्तुलाची क्रेझ दिसून येत आहे. पिस्तूल जवळ असल्यानंतर त्यांची हिंमत वाढत असल्याची माहिती पोलिसांनी वेगवेगळ्या घटनांत पकडलेल्यांकडून समोर आली आहे. भीतीपोटी देखील अनेक गुन्हेगार स्वत:जवळ बेकायदेशीर पिस्तूल बाळगताना आढळून आलेत. तो आपला गेम करेल, अशी त्यांना भीती असते. त्यामुळे गुन्हेगार सर्रास पिस्तूल बाळगत असल्याचे सांगितले जाते.
परराज्यांतून पिस्तुले पुण्यात येत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. पिस्तूल विक्री करणारी एक साखळी आहे. किरकोळ किमतीत पिस्तूल बाहेरून आणून पुण्यात त्याची दुप्पट किंवा वेळप्रसंगी तिप्पट किमतीने विक्री केली जाते. अशा विक्रेत्यांची यादी पोलिसांनी काढली आहे. परंतु, तरीही पुण्यात अवैध पिस्तुलांचा वापर होताना दिसत आहे.
उत्तमनगर परिसरात एका दुकानावर दरोडा टाकून सराइतांनी रोकड लुटली. त्यात सिंहगड पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडे पिस्तूल आढळून आले. एकाचा गोळ्या झाडून खून करण्यासाठी हे पिस्तूल त्यांनी परराज्यातून जाऊन आणले होते, अशी माहिती उघड झाली. तर, पुण्यात येताना त्यांच्याकडून मिस फायर झाले. त्यामुळे त्यांच्याकडे काडतुसांची कमतरता होती. त्यासाठी त्यांनी दुकान लुटीचा डाव केला. त्या पैशांतून ते पुन्हा जाऊन काडतूस आणणार होते.
किरकोळ कारणांतून एकमेकांवर खुनी हल्ला केला जात आहे, तर खुन्नस दिली म्हणून ठार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. गोळीबाराच्या घटना देखील वाढल्या आहेत. उपनगरातील छोट्या व्यावसायिकांकडून ही टोळकी खंडणी वसूल करू पाहत आहे. त्यामुळे स्थानिक गुंडांवर पोलिसांचा वचक कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. यात सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय. तर, काही घटनांमध्ये तर थेट गोळीबारापर्यंत गुन्हेगाराची मजल गेली आहे. ओठांवर मिसरूट न फुटलेली मुले पिस्तुलातून बार उडवत आहेत. गावठी कट्ट्यांची तस्करी करणार्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते खरी; परंतु अगदी सहज कट्टे या मुलांना कसे उपलब्ध होतात? हा देखील सवाल आहे.
हेही वाचा