Pune News : रिटेल व्यवसायात पुणे आघाडीवर; सीबीआरईचा अहवाल
पुणे : देशातील प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहराला व्यवसायासाठी प्राधान्य दिले जात आहे. कपडे, फॅशन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विविध प्रकारची पेये यांच्या दुकांनासाठी मुंबईपेक्षा पुण्याला अधिक पसंती मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत पुण्यातील 5 लाख 70 हजार चौरस फूट आणि मुंबईतील तीन लाख चौरस फूट दुकानांच्या जागेचे भाडेकरार झाले आहेत. अमेरिकेतील डॅलस येथील रियल इस्टेट सर्व्हिस एजन्सी सीबीआरईने भारतातील रिटेल रियल इस्टेट व्यवहाराबाबत गुरुवारी अहवाल जाहीर केला.
त्यात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या कालावधीत देशातील आठ प्रमुख शहरांतील 47 लाख 30 हजार चौरस फूट व्यावसायिक दुकानांचे भाडेकरार (लीज) झाले. गेल्या वर्षी याच काळात 32 लाख 30 हजार चौरसफूट रिटेल गाळ्यांचे व्यवहार झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यवहारात 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात मुंबई पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे.
जानेवारी ते सप्टेंबर 2022 मध्ये पुण्यातील 3 लाख 70 हजार चौरस फुटांचे व्यवहार झाले होते. त्यात 5 लाख 70 हजार फुटांपर्यंत वाढ झाली आहे. त्यातही यंदा दसरा आणि दिवाळीपूर्वीच्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत साडेचार लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अवघे 40 हजार चौरस फुटांचे भाडेकरार झाले होते.
पुणे आणि दिल्लीत घरगुती वापराच्या वस्तूंच्या दुकांनासाठी व्यावसायिक जागांना अधिक मागणी आहे. मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये आणि फॅशन-पोशाखांच्या दुकानांचा वाटा एकूण लीज व्यवहारात 30 टक्के आहे. मुंबईत जानेवारी ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 3 लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत.
जानेवारी-सप्टेंबर 2023 मधील लीज व्यवहार
शहर लाख चौरस फूट
दिल्ली 9
बेंगळुरू 14
मुंबई 3
पुणे 5.7
हैदराबाद 6
चेन्नई 5
कोलकाता 1
अहमदाबाद 4
19 ऑक्टोबर – रिटेल स्पेस
हेही वाचा