पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटील याचा साथीदार रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी (वय -26) याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेहान याच्यावर साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला ऑगस्टअखेर त्यांनी पकडले होते. सध्या तो साकीनाका पोलिसांच्या ताब्यात होता. तर पाटील याच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात अमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
त्या गुन्ह्याशी रेहान याचा संबंध आढळून आल्याने त्याला पुणे पोलिसांनी साकीनाका पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. ड्रग्ज माफिया पाटील याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्यांना पकडत पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ऑगस्टअखेर रेहान याला अटक केली होती.
पुण्यात ललित पाटील याच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये त्याचा संदर्भ लागल्याने पुणे पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले. ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एनडीपीएसच्या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 कडे वर्ग करण्यात आला आहे. या सहा आरोपींव्यतिरिक्त ललितला पळून जाण्यासाठी आर्थिक मदत करणार्या प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या त्याच्या दोन मैत्रिणींनादेखील बुधवारी रात्री पुणे पोलिसांनी नाशिक येथून अटक केली.
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात गोलूकडून ड्रग विक्री रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी हा नाशिक येथील फॅक्टरीत तयार करण्यात आलेले ड्रग मुंबई येथे घेऊन जात होता. गोलू हे ड्रग मुंबईतील तस्कर इम्रान शेख याला देत होता. इम्रान शेख हे ड्रग विकून त्यातून आलेले पैसे गोलूला देत असे. नंतर गोलू हे पैसे भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना देत असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले. गोलू याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ड्रग विक्री केल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा