

पुणे: इराण आणि युनायटेड स्टेटच्या वाढलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर उमटणार आहे. गेल्या काही वर्षांत सुरक्षित आणि आकर्षक परतावा देणारे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्ननगरी दुबईमधील मालमत्ता गुंतवणुकीकडे पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात वळण घेतले होते. मात्र, सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे नव्या गुंतवणुकीला बेक लागणार आहे.
पुण्यातील आयटी व्यावसायिक, डॉक्टर, उद्योजक आणि एनआरआय कुटुंबीयांनी दुबईतील निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. काहींनी भाडे उत्पन्नासाठी फ्लॅट खरेदी केले, तर काहींनी ‘गोल्डन व्हिसा’च्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक केली होती.
मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि चलनबाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. पुण्यातील रिअल इस्टेट सल्लागारांच्या माहितीनुसार, मागील महिन्याभरात दुबई प्रकल्पांसाठी होणाऱ्या चौकशीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. काही गुंतवणूकदारांनी बुकिंग पुढे ढकलले असून, काहींनी हप्त्यांच्या देयकांबाबत पुनर्विचार सुरू केला आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत कुटुंबीयांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काही पुणेकर गुंतवणूकदारांनी देशांतर्गत पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. पुणे, मुंबई आणि बंगळुरू येथील प्रीमियम प्रकल्पांना याचा फायदा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. स्थिती लवकर सुरळीत झाल्यास दुबई बाजार पुन्हा वेग पकडू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. मात्र, तोपर्यंत पुणेकर गुंतवणूकदार सावध पवित्रा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला फटका बसणार आहे. आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात दुबईमध्ये रिअल इस्टेटला मागणी होती. निश्चितपणे या घटनेचा पडसाद रिअल इस्टेटवरती पडेल यामध्ये काही शंकाच नाही. दुबईमध्ये सर्वाधिक गुंतवणूक भारतीयांची होती. अनेक व्यवसायामध्ये भारतीयांचा वाटा अधिक आहे.
राजेश बाहेती, उद्योजक