

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. विमानतळाचे जुने टर्मिनल नवीन टर्मिनलला जोडण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे पुणे विमानतळाची प्रवासीक्षमता थेट दुपटीने वाढणार आहे. याचा मोठा फायदा पुणेकरांना आणि नियमित प्रवास करणाऱ्यांना होणार आहे.
वेळ वाचणार; प्रवास होणार सुसह्य
सध्याच्या क्षमतेच्या तुलनेत दोन्ही टर्मिनल्स एकत्र आल्यावर पुणे विमानतळाची प्रवासीक्षमता दुपटीने वाढणार आहे. यामुळे पिक अवर्समध्ये (विमानांच्या गर्दीच्या वेळी) होणारी प्रवाशांची गर्दी कमी होईल. चेक इन काउंटर्स, सुरक्षा तपासणीच्या रांगा आणि बॅगेज क्लेम बेल्ट्सची संख्या वाढल्यामुळे पुणेकरांचा विमानतळावरील वेळ वाचणार आहे आणि प्रवास अधिक सुसह्य होणार आहे.
सुरक्षेची तपासणी करणार
विमानतळाचे दोन्ही टर्मिनल्स एकमेकांना जोडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व स्ट्रक्चरल (बांधकाम विषयक) काम पूर्ण झाले आहे. आता फक्त जुन्या टर्मिनलमध्ये नवीन सुरक्षा उपकरणे आणण्याची आणि ती कार्यान्वित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. ही अत्याधुनिक उपकरणे आल्यानंतर दोन्ही टर्मिनलच्या सुरक्षेची तपासणी केली जाईल.
सुरक्षा परवानगीनंतर टर्मिनल होणार एकत्र
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्याकडून अंतिम सुरक्षा परमिशन मिळाल्यानंतर जुने टर्मिनल अधिकृतपणे नवीन विमानतळ टर्मिनलला जोडले जाईल. त्यानंतर दोन्ही टर्मिनल्स एकाच मोठ्या एकात्मिक टर्मिनलसारखे काम करतील.
पुणे विमानतळावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जुने आणि नवीन टर्मिनल जोडण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे होते. याचे स्ट्रक्चरल काम आता पूर्ण झाले असून, नवीन सुरक्षा उपकरणे बसविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आवश्यक सुरक्षा परवानग्या मिळताच हे दोन्ही टर्मिनल्स प्रवाशांसाठी खुले केले जातील. यामुळे पुणे विमानतळाची प्रवासी क्षमता दुपटीने वाढेल, ज्यामुळे पुणेकरांना अधिक आधुनिक सुविधा आणि गर्दीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल. पुणेकरांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ