

पुणे: शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी राबविण्यात आलेल्या ‘इंदूर पॅटर्न’ला महापालिका लवकरच पूर्णविराम देण्याच्या तयारीत आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांची घटती कार्यक्षमता, वाढता देखभाल खर्च आणि अंमलबजावणीतील अडचणी लक्षात घेता प्रशासनाने या मॉडेलचा फेरविचार सुरू केला असून, शहरासाठी नव्या कचरा व्यवस्थापन धोरणाची आखणी केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी इंदूर येथील यशस्वी कचरा व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करून पुण्यात ‘इंदूर पॅटर्न’ लागू केला होता. घराघरांतून कचरासंकलन, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे तसेच स्थानिक स्तरावर कचऱ्यावर प्रक्रिया करणे, या संकल्पनांवर आधारित ही व्यवस्था राबवली होती. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्याने अपेक्षित परिणाम मिळाले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरातील अनेक भागांमध्ये कचरा वर्गीकरणाचे प्रमाण समाधानकारक नाही. त्याचबरोबर कंत्राटदारांवरील अवलंबित्व वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या देखभालीसाठी मोठा निधी खर्च करावा लागत असून, त्यांची कार्यक्षमताही घटल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या स्थानिक गरजा आणि परिस्थिती लक्षात घेऊन नवीन कचरा व्यवस्थापन धोरण तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
आगामी धोरणामध्ये प्रक्रिया प्रकल्पांची पुनर्रचना, स्थानिक पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर, यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, ‘इंदूर पॅटर्न’ बंद करण्याच्या हालचालीवर पर्यावरणप्रेमी आणि विविध नागरिक संघटनांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते, ही प्रणाली काटेकोरपणे आणि सातत्याने राबवली असती तर पुण्यातही सकारात्मक बदल दिसून आले असते, तर काही जणांच्या मते, शहराची वाढती लोकसंख्या आणि स्थानिक अडचणी लक्षात घेता नव्या धोरणाची गरज आहे.
पुण्यात राबविलेल्या ‘इंदूर पॅटर्न’ची वैशिष्ट्ये
घराघरांतून दररोज कचरासंकलन व्यवस्था
ओला आणि सुका कचरा वेगळा देणे बंधनकारक
सोसायटी, हॉटेल्स आणि संस्थांकडून स्रोतस्थळीच कचरा प्रक्रिया
कचरा वाहतूक वाहनांवर जीपीएस आणि ॲपद्वारे देखरेख
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
स्वच्छतेबाबत सातत्याने जनजागृती मोहीम
कंत्राटदारांच्या कामावर नियमित नियंत्रण आणि निरीक्षण
सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर आणि उत्पन्ननिर्मितीवर भर
डंपिंग ग््रााउंडवर जाणारा कचरा कमी करण्यासाठी ‘शून्य कचरा’ संकल्पना