पुणे: शहरातील नागरिकांना माफक दरात चांगली रुग्णसेवा मिळावी, या हेतूने महापालिकेने स्वत:च्या जागेवर वारजे माळवाडी आणि बाणेर येथे सुसज्ज रुग्णालये उभारण्यास खासगी एजन्सीला परवानगी दिली. मात्र, रुग्णांना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत किंवा माफक दरात उपचार द्यायचे, याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. त्यामुळे महापालिकेच्या जागेवर रुग्णालय, तरीही मोफत रुग्णसेवेलाच हरताळ, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड बाणेर येथील आयआयएमएस जेटी फाउंडेशनला देण्यात आला असून, या जागेवर रुग्णालय उभारण्यात आले आहे. या दवाखान्यात सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळतात का? याची पाहणी दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने केली. हे रुग्णालय धर्मादाय असून, असा बोर्ड दवाखान्यासमोर लावला आहे.(Latest Pune News)
महापालिकेचा बोर्डदेखील लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात दवाखान्यात विचारपूस केली असता केवळ महापालिकेचे कर्मचारी असल्यास तसेच त्यांच्याकडे शहरी गरीब योजनेचे कार्ड असल्यास त्यांच्यावर माफक दरात उपचार होत असल्याची माहिती मिळाली. त्यातही महापालिकेने मंजूर केलेल्या रकमेपर्यंतच सवलत मिळते. त्यावरील रक्कम मात्र रुग्णांना भरावी लागते, अशी माहिती येथील कर्मचार्यांनी दिली.
अँजिओग्राफी करायची झाल्यास या ठिकाणी इतर तपासण्यांसह 4 ते 7 हजार रुपये भरावे लागतात. अँजिओप्लास्टी करण्याची असल्यास त्याचा खर्च लाखाच्या वर जातो. या दवाखान्यात उपचाराचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. मात्र, कोणतेही दरपत्रक दिसेल अशा ठिकाणी लावण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा जागेवर खासगी रुग्णसेवा देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नावालाच सरकारी
‘वडिलांची अँजिओप्लास्टी करायची आहे. पण, हातात फारसे पैसे नाहीत. इथे मोफत उपचार होऊ शकतील का?’ असे नातेवाइकाने विचारले असता ‘मोफत नाहीत; मात्र अल्पदरात उपचार होऊ शकतील,’ असे उत्तर स्वागत कक्षातील कर्मचार्याकडून देण्यात आले. महात्मा फुले योजनेतूनही उपचार होऊ शकणार नाहीत, असे सांगण्यात आले. ‘इथे महात्मा फुले योजना चालते, असे मला समजले आहे.
मला व्यवस्थापनप्रमुखांना भेटायचे आहे,’ असे विचारल्यावर ‘उद्या या’ असे उत्तर मिळाले. वारजे माळवाडीमधील गणपती माथ्याजवळ बराटे दवाखान्यासमोरच पुणे महापालिकेकच्या जागेवर सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहिले आहे. मात्र, हे रुग्णालय केवळ नावालाच महापालिकेचे आहे. ‘खासगी’प्रमाणे चकाचक दिसणार्या या रुग्णालयात डायलिसिस, कॅथेटर, फिस्टुला वगळता इतर सर्व उपचारांसाठी पैसे मोजावे लागत आहेत.
पुणे महापालिकेच्या जागेवर ट्रस्ट हेल्थकेअर फाउंडेशनचे प्लॅटिनम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल दिमाखात उभे आहे. रुग्णालयात हृदयरोगविकारावरील तपासण्या आणि उपचार, आयसीयू सुविधा, नवजात शिशू अतिदक्षता विभाग या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय या तपासण्याही करण्याची सोय आहे.
रुग्णालयात सर्व उपचार सीजीएचएस योजनेपेक्षा 2 टक्के कमी दरांनी करण्यात येत आहेत. मात्र, गरीब व गरजू रुग्णांना औषधे घेण्यासाठी पैसे नसताना उपचारांसाठी कुठून आणायचे की त्यांनी ससून रुग्णालयाची वाट धरायची? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
इथे पैसेवाल्यांनाच मिळते दृष्टी
पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर माफक दरात उपचार मिळावेत, यासाठी बोपोडी येथील महापालिकेचा मोठा भूखंड व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन आणि दत्तात्रय वळसे पाटील आय केअर चॅरिटेबल हॉस्पिटलला देण्यात आला. महापालिकेच्या मदतीने या ठिकाणी डोळ्यांचा दवाखाना उभारण्यात आला. मात्र, या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचारी व शहरी गरीब योजनेच्या मोजक्याच लोकांना माफक दरात उपचार मिळत आहेत.
मोतीबिंदूची बिनटक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी 30 ते 35 हजार, तर योजनेतील रुग्णांना तपासण्यासह 10 हजार रुपये भरावे लागतात. जर लेन्स चांगली टाकायची असेल तर जास्तीचे पैसे स्वत:च्या खिशातून द्यावे लागतात. बोपोडी येथील आयटी पार्कशेजारी असलेल्या महानगरपालिकेच्या एका मोठ्या भूखंडावर हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी प्राथमिक तपासणी फी 320 रुपये आहे, तर रेटिना तपासणी आणि सुपर स्पेशालिटी फी 800 रुपये आहे.
प्रायव्हेट ओपीडी फी थेट 1200 रुपये आहे, तर बिनटाक्याच्या मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी चार हजार ते फेको पद्धतीची मोतीबिंदूची शास्त्रक्रिया करण्यासाठी बारा हजार रुपये मोजावे लागतात तर फेम्टो लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी 35 हजार रुपये मोजावे लागतात. तसा बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचार्यांना चांगली लेन्स बसवायची असेल तर त्यांना त्यानुसार पैसे मोजावे लगतात, अशी माहिती येथील कर्मचार्यांनी दिली.
माझ्या वडिलांना हृदयरोगाचा त्रास आहे. त्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. येथे शहरी गरीब योजनेची चौकशी केली असता पालिकेचे पत्र आणि योजनेचे कार्ड घेऊन येण्यास सांगितले. हे कार्ड नसेल तर खासगी दराने उपचार करावे लागतील. ब्लॉकेज काढण्याचा खर्च दीड ते दोन लाखांपर्यंत येऊ शकतो. तुम्ही योजनेत येत असाल, तर योजनेत मंजूर खर्चापेक्षा जास्त पैसे लागल्यास ते तुम्हाला भरावे लागतील, असे सांगण्यात आल्याचे रुग्णाच्या नातेवाइकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.