Kadbanwadi Safari
कडबनवाडीची ग्रासलँड सफारी टाकतेय कात!Pudhari

Kadbanwadi Safari: कडबनवाडीची ग्रासलँड सफारी टाकतेय कात!

हिरव्यागार जंगलातील वळत जाणारी वाट...
Published on

सुनील जगताप

पुणे: हिरव्यागार जंगलातील वळत जाणारी वाट... त्यात उघड्या जीपमध्ये दुर्बिणी सरसावून बसलेले निसर्गप्रेमी... मधूनच जमिनीवरूनच वेगात तरंगत जाणारा चिंकारांचा कळप... अवचित दिसलेला तरस, ससा, कोल्हा आणि नशीब जोरदार असेल तर लांडग्याचे झालेले दर्शन... हे काही मध्य प्रदेश किंवा कर्नाटकातील एखाद्या प्रसिद्ध अभयारण्यातील चित्र नव्हे, तर पुण्यापासून अवघ्या 135 किलोमीटर अंतरावरच्या कडबनवाडीतील आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील भिगवणजवळच्या कडबनवाडी परिसरातील खुरट्या, गवताळ वनातील वनश्री अन् वन्यजीवन दाखविण्यासाठी वन विभागाने खास सफारी उपक्रम सुरू केला आहे.  (Latest Pune News)

Kadbanwadi Safari
Pune Robbery Case: चोरट्यांनी धमकावून सेवानिवृत्त विंग कमांडरचे घर लुटले; 59 लाख 24 हजारांचा ऐवज चोरी

ऑक्टोबर 2023 मध्ये पुणे वन विभागाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील पहिला असा गवताळ सफारी प्रकल्प असून, त्या प्रदेशातील जैवविविधतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. स्थानिकांचा समावेश असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तिकिटांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न या समितीला मिळते. ज्यामुळे स्थानिक लोकांचा प्रकल्पात थेट सहभाग आणि फायदा होतो.

वन विभागाच्या वतीने ऑक्टोबर 2023 मध्ये हा प्रकल्प सुरू केला आहे. जुलै 2025 पर्यंत 5 हजार 296 सफारीमधून 15 हजार 36 पर्यटकांनी भेट दिली असून, वन विभागाला 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये चालक, जिप्सीमालक, गार्ड, स्थानिक नागरिक यांना त्यातून 21 लाख 47 हजार रुपये मिळालेआहेत.

वन विभागाच्या वतीने कडबनवाडीबरोबरच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे देखील असाच प्रकल्प उभारण्यात आलेला असल्याचे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश ताटे यांनी सांगितले.

Kadbanwadi Safari
Khadakwasla Dam: खडकवासलातून मुठा नदीत विसर्ग; घाटमाथ्यासह पानशेत परिसरात संततधार

या सुविधांची आवश्यकता

  • पर्यटकांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल माहितीची सुविधा.

  • पक्षी-प्राण्यांची माहिती देणारे फलक उभारणे.

  • पर्यटकांसाठी बांबू गॅझेबो बांधणे, सेल्फी पॉइंट्स तयार करणे.

  • पक्षिनिरीक्षणासाठी जागा तयार करणे.

  • सफारी मार्गाचे नूतनीकरण करणे.

  • आकाशनिरीक्षणासाठी टेलिस्कोपची व्यवस्था करणे.

  • सफारी वाहनक्षमता वाढविणे.

  • लोखंडी रेलिंग आणि सुरक्षा कॅमेरे बसविणे.

काय आहेत वैशिष्ट्ये

  • कडबनवाडी सफारीत कोल्हा, चिंकारा (इंडियन गझेल), लांडगा, ससे, खोकड, तरस (हायना) यांसारखे प्राणी आणि विविध प्रकारचे गवताळ प्रदेशातील पक्षी तसेच सरपटणारे प्राणी यांचा समावेश.

  • रेन क्वेल, अ‍ॅशी-क्राउंड स्पॅरो लार्क, ग्रे-नेक्ड बंटिंग आणि पेंटेड फ्रँकोलिन यांसारखे 330 हून अधिक प्रजातींचे पक्षी.

  • कडबनवाडी गेटपासून सुमारे 30 किलोमीटरचा सफारीचा मार्ग.

  • सफारीमुळे स्थानिक कुटुंबांना रोजगार.

  • स्थानिक लोकांना गाइड म्हणून प्रशिक्षण.

  • सफारीसाठी सकाळी 6 ते 9 आणि दुपारी 3 ते 6 अशी वेळ.

  • grarrlandrafari.org या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग.

गवताळ प्रदेश ही पडीक जमीन नाही. या प्रदेशातील परिसंस्था वेगळी असते. पर्यटक वाघ, सिंह बघायला जातात. पण, त्यांनी या गवताळ प्रदेशाचा, तेथील वनस्पतींचाही आनंद घेणे आवश्यक आहे. या हेतूने हा उपक्रम सुरू झाला असून, गवतामध्ये राहणार्‍या वन्यजीवांचे दर्शन या सफारीमधून होणार आहे.

- अनुज खरे, माजी मानद वन्यजीवरक्षक

कडबनवाडी ग्रासलँड सफारी या ठिकाणी विविध योजनांचे नियोजन केले असून, वेगवेगळ्या साहित्यांची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला असून, चर्चा करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. सध्या तीन जिप्सी घेण्यात आलेल्या आहेत. सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास, अशा दोन वेळांमध्ये ही सफारी सुरू असून, त्याला आत्तापर्यंत खूप चांगला प्रतिसाद पर्यटकांनी दिलेला आहे. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. - महेश ताटे,

सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वन विभाग

कडबनवाडीमध्ये सलग 3 हजार 500 हेक्टर जागा वन विभागाची आहे. सुरुवातीला लोकांचा विरोध होता. परंतु, नागरिकांची समजूत काढली असून, त्यांचेही आता सहकार्य मिळत आहे. त्याचबरोबर सन 2020 मध्ये मी ऑक्सिजन पार्कची संकल्पना आणली आणि 50 एकरावर हे पार्क उभे केले आहे. त्या ठिकाणी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, बाहवा अशी अनेक झाडे सरकारच्या मदतीशिवाय लावली आहेत.

- भजनदास पवार, अध्यक्ष, संयुक्त वनसंरक्षण समिती, कडबनवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news