

Pune Hospital Bomb Case: पुण्यातील हडपसर परिसरातील रुग्णालयाबाहेर जिवंत बॉम्ब (IED) ठेवल्याच्या धक्कादायक प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे काही दिवसांपासून पुण्यात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणानंतर तपास यंत्रणांना मोठा धागा मिळाला आहे.
माहितीनुसार, शिवाजी राठोड असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. आरोपी आझाद हिंद एक्सप्रेसने नागपूरला पोहोचणार असल्याची माहिती ATS ला मिळाली होती. त्यानंतर नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचण्यात आला. गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आल्यानंतर आरोपी खाली उतरताच आधीपासूनच तैनात असलेल्या ATS च्या पथकाने त्याला वेढा घालत ताब्यात घेतले. संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय आणि शिताफीने पार पडल्याचे सांगितले जात आहे.
सध्या आरोपीची नागपूर येथील ATS कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का? आरोपीने हे कृत्य नेमक्या कोणत्या हेतूने केले? याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
बुधवारी सायंकाळी हडपसरमधील कामधेनू इस्टेट परिसरात असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पद बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस, बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
परिसर तातडीने सील करण्यात आला आणि रुग्णालय परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले. तपासादरम्यान ती वस्तू जिवंत IED असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, बॉम्ब निकामी पथकाने वेळीच कारवाई करत संभाव्य मोठी दुर्घटना टाळली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ATS आणि गुप्तचर यंत्रणा (IB) तपासात सहभागी झाल्या होत्या. तपासासाठी परिसरातील 100 हून अधिक CCTV फुटेज तपासण्यात आले. संशयास्पद हालचालींच्या आधारे अनेकांची चौकशी करण्यात आली. तांत्रिक पुरावे आणि फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा आरोपीपर्यंत पोहोचल्या आणि त्याचे लोकेशन नागपूरमध्ये असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठे पोहोचतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.