Pune Hadapsar Bomb: पुणे हॉस्पिटल बॉम्बप्रकरणात मोठी घडामोड; CCTV मधील व्यक्ती स्वतःहून चौकशीसाठी हजर

Pune Hospital Bomb Scare: पुण्यातील हडपसरमधील एका रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने गुरुवारी मोठी खळबळ उडाली. CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (MR) असल्याची माहिती आहे.
Pune Hadapsar Bomb
Pune Hadapsar BombPudhari
Published on
Updated on

Pune Hospital Bomb Scare: पुण्यातील हडपसर परिसरात एका रुग्णालयाच्या आवारात बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने गुरुवारी सायंकाळी मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पुणे पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि पुणे गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. रात्री उशिरा ही संशयित वस्तू सुरक्षितपणे निकामी करण्यात पोलिसांना यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरच्या मध्यवर्ती भागातील एका रुग्णालयात गुरुवारी (दि. १३) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना घडली. रुग्णालयाच्या बाथरूम परिसरात एका व्यक्तीला संशयास्पद वस्तू आढळून आली. सुरुवातीला ती वस्तू बॉम्बसदृश्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. संबंधित व्यक्तीने ती वस्तू बाहेर आणून ठेवली आणि तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) परिसर ताब्यात घेत संशयित वस्तू मोकळ्या जागेत हलवली आणि रात्री उशिरा ती सुरक्षितपणे निकामी केली. यामुळे संभाव्य धोका टळला असला, तरी या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, तपासादरम्यान समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या एका व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित व्यक्ती हा एमआर (Medical Representative) असल्याचे समोर आले आहे. तो औषध कंपन्यांशी संबंधित कामानिमित्त नियमितपणे रुग्णालयात ये-जा करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Hadapsar Bomb
Gold Price History: स्वातंत्र्यावेळी 79 रुपये असलेलं 10 ग्रॅम सोनं आज 1.6 लाखांवर; सोन्याने 79 वर्षांत दिला चकित करणारा परतावा

विशेष म्हणजे, CCTV मध्ये दिसणारी ही व्यक्ती स्वतःहून चौकशीसाठी पोलिसांकडे आल्याचे समजते. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने, “या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही,” असा दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिस त्याच्या हालचाली, रुग्णालयातील उपस्थिती आणि CCTV फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

Pune Hadapsar Bomb
Virat Kohli Video: ‘एक दिवस हे सगळं संपणार...’ शतकानंतर विराट कोहलीचं भावूक वक्तव्य, चाहते चिंतेत

सध्या या प्रकरणाचा पुणे पोलिस, ATS, गुन्हे शाखा आणि BDDS संयुक्तपणे तपास करत आहेत. ही वस्तू नेमकी कोणी ठेवली? त्यामागचा उद्देश काय होता? आणि हा खरोखर कटाचा भाग होता की घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news